Ayodhya Ram Mandir : अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन 22 जानेवारीला होत आहे. मंदिराच्या उद्घाटनासाठी देश तर सज्ज झालाच आहे, मात्र परदेशातून देखील उत्साह दिसून येत आहे.  राम मंदिर प्रतिष्ठापणा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांनी सुट्टी घोषित केली आहे.


तर आता मॉरिशस (Mauritius) सरकार या कार्यक्रमासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. 22 जानेवारी रोजी हिंदू अधिकाऱ्यांसाठी मॉरिशस सरकारने दोन तासांची विशेष सुट्टी जाहीर केली आहे. जेणेकरून हिंदू अधिकाऱ्यांना हा सोहळा पाहता येईल. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखाली मॉरिशस मंत्रिमंडळाने ही घोषणा केली आहे.


22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना


अयोध्येत 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले आहे. १६ जानेवारीपासून हा उत्सव सुरू होणार आहे. सात दिवस हा सोहळा चालणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने २२ जानेवारी रोजी दुपारी राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय घेतला आहे.


हिदूंना दोन तासांची विशेष सुट्टी


हिंदूंसाठी ही एक ऐतिहासिक घटना आहे, कारण ती प्रभू रामाच्या पुनरागमनाचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत मॉरिशस सरकारचे हिंदू अधिकारी आणि कर्मचारी त्या दिवशी 2 तासांच्या विशेष रजेवर असतील. भावना आणि परंपरांचा आदर करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी सांगितले. 


मॉरिशसमध्ये 48.5 टक्के हिंदू


मॉरिशसमध्ये हिंदू धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे. येथील सुमारे 48.5 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. आफ्रिकेतील हा एकमेव देश आहे जिथे इतक्या मोठ्या संख्येनं हिंदू राहतात. जागतिक पातळीवर पाहिले तर हिंदू लोकसंख्येच्या बाबतीत भारत आणि नेपाळनंतर मॉरिशसचा क्रमांक लागतो.


प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणाला निमंत्रण?


राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील सर्व मान्यवरांना निमंत्रण पत्रही पाठविण्यात आली आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6000 हून अधिक लोक या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा दिवस भारतात एखाद्या मोठ्या सणासारखा साजरा करण्यात येणार आहे. याच दिमाखादार सोहळ्याचं निमंत्रण पत्र आता समोर आलं आहे.  


अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी  पाठवण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात म्हटलं आहे की, मंदिराच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता प्रवेश करावा लागेल. कार्यक्रम किती तास चालेल? कार्यक्रमात कोणत्या गोष्टी आणणे बेकायदेशीर आहे? या सर्व गोष्टी निमंत्रण पत्रात लिहिलेल्या आहेत. तसेच 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत विशेष विधी होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध संप्रदायातील संतही उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


आणखी वाचा