बहुतांश एटीएम आज बंद, बँकांमध्ये तुफान गर्दी
एबीपी माझा वेब टीम | 10 Nov 2016 08:24 AM (IST)
मुंबई : बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये आजपासून पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. पण एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला आणखी एक दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण बहुतांश एटीएम आज बंद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद केल्याचं जाहीर केल्यानंतर बुधवारी (9 नोव्हेंबर) रोजी देशभरातील सर्व एटीएम बंद होते. आज एटीएम सुरु होतील, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती, परंतु आजही बरेचसे एटीएम बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर केवळ, 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रुपयांच्या नोटाच चलनात आहेत. शिवाय नोटा एटीएममध्ये अजून सर्क्युलेट झालेल्या नाहीत. परिणामी 100 रुपयांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बहुतांश एटीएम आज बंद आहेत. एटीएम बंद असल्याने बँकांमध्ये तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. बँका लवकर उघडतील म्हणून लोकांची गर्दी केली आहे. मात्र जास्त रक्कम काढू नका, आवश्यक तेवढेच पैसे काढा, असं आवाहन बँकेकडून करण्यात आलं आहे. संबंधित बातम्या