Atiq Ahmad Son Encounter: कुख्यात गँगस्टर अतीक अहमदच्या मुलाचं आणि आणखी एका शूटरचं एन्काऊंटर झालंय. असद असं अतीकच्या मुलाचं नाव आहे. उमेश पाल खून (Umesh Pal Murder Case) प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. याच प्रकरणात गुलाम नावाचा शूटर सह-आरोपी होता. त्याचाही एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सनं झाशीमध्ये (Jhansi) ही कारवाई केली. या दोघांकडून परदेशी बनावटीची शस्त्रही हस्तगत करण्यात आली आहेत. 






या एन्काऊंटर संबंधित माहिती देताना उत्तर प्रदेश पोलीस म्हणाले की,  अतिक अहमदचा मुलगा असद आणि मकसूदनाचा मुलगा गुलाम हे दोघेही उमेश पाल हत्याकांड प्रकरणात वॉन्टेड होते. झाशीचे डीएसपी नवेंदु आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपीच्या एसटीएफसोबत (UP STF) झालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे.   एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना हत्यारं टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितलं, मात्र दोन्ही आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला.. प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात दोघंही ठार झाले. या दोघांवरही पाच-पाच लाखांचं बक्षीस होतं.  


मुख्यमंत्री योगींची प्रतिक्रिया


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया देताना यूपी एसटीएफचे कौतुक केले आहे. मुख्य सचिव संजय प्रसाद यांनी या एन्काऊंटरची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या एन्काऊंटरनंतर मुख्यमंत्र्यांसमोर या संदर्भातील संपूर्ण  रिपोर्ट सादर केला आहे. उमेश पाल हत्याकांड प्रकरणानंतर असद फरार होता.


बहुनज समाज पार्टीचे आमदार राजू पाल हत्या प्रकरणात उमेश पाल प्रमुख साक्षीदार


2005 साली बहुनज समाज पार्टीचे आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल आणि त्याच्या दोन सुरक्षारक्षकांची 24 फेब्रुवारीला प्रयागराजच्या धूमनगंड येथे हत्या करण्यात आली होती. 


कोण आहे असद अहमद?



  • यूपीतील उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी 

  • अतीक अहमदचा तिसरा मुलगा 

  • उमेश पालवर गोळीबार केल्याचा आरोप

  • असद  उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, नेपाळ पोलिसांच्या रडारवर