नवी दिल्ली : अटल बिहारी वाजपेयी यांना हिंदी चित्रपट पाहण्याचीही आवड होती. भाजपच्या खासदार असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचे ते मोठे चाहते होते. ड्रीमगर्ल हेमा मालिनींची मुख्य भूमिका असलेला 'सीता और गीता' हा चित्रपट वाजपेयींनी एक-दोन नव्हे, तर तब्बल 25 वेळा पाहिला होता. हेमा मालिनी यांनी हा किस्सा सांगितला होता.
रमेश सिप्पी दिग्दर्शित 'सीता और गीता' हा चित्रपट 1972 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात हेमा मालिनीचा डबल रोल होता. धर्मेंद्र आणि संजीव कुमारही या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. हेमा मालिनीला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा 'फिल्मफेअर' मिळाला होता.
'मी भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांचा नेहमी उल्लेख करते, पण कधी त्यांची भेट झालेली नाही. कृपया माझी त्यांच्याशी भेट घडवा, असं मी एकदा भाजप पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. त्यानंतर माझी अटलजींशी भेट घालून देण्यात आली. मात्र अटलजी माझ्याशी बोलताना जरा अडखळत होते. मी एका महिलेला विचारलं, काय झालं? अटलजी नीट बोलत का नाहीत? त्यावर तिने सांगितलं की खरं तर अटल बिहारी वाजपेयी तुमचे खूप मोठे फॅन आहेत. तुमचा सीता और गीता हा सिनेमा त्यांनी 25 वेळा पाहिला आहे. अचानक तुम्हाला समोर पाहून ते बावरले आहेत.' असा किस्सा हेमा मालिनी यांनी सांगितला होता.
चित्रपटांसोबतच अटल बिहारी वाजपेयी यांना खाण्या-पिण्याचीही आवड होती. ग्वाल्हेरच्या बहादुरा भागातील बुंदीचे लाडू आणि दौलतगंजमध्ये मूगडाळीपासून तयार केले जाणारे मंगौडी असे पदार्थ त्यांना विशेष आवडायचे. शाकाहारापेक्षा ते जास्त मांसाहार करायचे, त्यातल त्यांना कोलंबी जास्त पसंत होती. पंतप्रधान झाल्यावर ते ग्वाल्हेरला जाऊन लाडू, जिलेबी, कचोरी खात असत.