नवी दिल्ली : चार राज्यातील पाच विधानसभांच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने तीन ठिकाणी विजय मिळवला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आरकेनगरमध्ये अपक्ष उमेदवार दिनाकरन यांचा विजय झाला.
भाजपने उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद विधानसभा मतदारसंघ आणि अरुणाचल प्रदेशातील दोन जागांवर विजय मिळवला. उत्तर प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही ठिकाणी सध्या भाजपचीच सत्ता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली.
उत्तर प्रदेशचा निकाल
यूपीतील सिकंदराबाद मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अजीत पाल यांनी विजय मिळवला. त्यांनी समाजवादी पक्षाच्या सीमा सचान यांचा 11 हजार 161 मतांनी पराभव केला. भाजप आमदार मथुरा प्रसाद पाल यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.
तामिळनाडूत भाजपला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं
दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर आरकेनगरमधील जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी जयललिता यांचा पक्ष एआयएडीएमकेच्या विरोधी गटाचे उमेदवार टीटीव्ही दिनाकरन यांनी विजय मिळवला. दिनाकरन यांनी या विजयानंतर मरीना बीचवर पक्षाचे संस्थापक एमजी रामचंद्रन आणि जयललिता यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
दरम्यान, पलानीसामी सरकार तीन महिन्याच्या आत पडणार असल्याचा दावा यावेळी दिनाकरन यांनी केला. जयललिता यांनी 2015 च्या पोटनिवडणुकीत आणि 2016 च्या निवडणुकीत आरकेनगरमधून विजय मिळवला होता. भाजप उमेदवाराला या निवडणुकीत 'नोटा'पेक्षाही कमी मतं मिळाली.
अरुणाचल प्रदेशचा निकाल
अरुणाचल प्रदेशातील पाक्के कसांग आणि लिकाबली मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. 60 जागा असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेत आता भाजपचे 49 आमदार झाले आहेत, तर पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलचे 9, काँग्रेसचा एक आणि एक अपक्ष उमेदवार आहे.
पश्चिम बंगालचा विजय
पश्चिम बंगालच्या सबांग विधानसभा मतदारसंघातील या पोटनिवडणुकीत तृणमुल काँग्रेसने (टीएमसी) विजय मिळवला. टीएमसीच्या गीता रानी भुनिया यांनी माकपच्या रिता मंडल यांचा 64 हजार 192 मतांनी पराभव केला.
पोटनिवडणूक : 3 जागांवर भाजप, तामिळनाडूत जयललितांच्या जागी दिनाकरन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Dec 2017 07:51 PM (IST)
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आरकेनगरमध्ये अपक्ष उमेदवार दिनाकरन यांचा विजय झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -