अहमदाबाद : गुजरात, पंजाब, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये या चार राज्यांमधील विधानसभेच्या पाच जागांच्या पोटनिवडणुकांची मतमोजणी पार पडली. पाच पैकी एका जागेवर भाजपनं विजय मिळवला. आम आदमी पार्टीनं 2 जागांवर विजय मिळवला आहे. तर , काँग्रेस आणि टीएमसीनं एका जागेवर विजय मिळवला आहे. गुजरातमध्ये दोन मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यापैकी एका जागेवर भाजपनं तर एका जागेवर आम आदमी पार्टीनं विजय मिळवला आहे. कडी मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला तर विसावदर मतदारसंघात आपनं विजय मिळवला. 

विसावदर या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत आपनं विजय मिळवला होता. आपच्या आमदारांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत आपनं विजय मिळवला. विसावदरमध्ये आपचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी विजय भाजपच्या किरीट पटेल यांना पराभूत केलं. कडी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजेंद्र चावडा यांनी विजय मिळवला.  

विसावदरमध्ये भाजपचा 2007 मध्ये शेवटचा विजय  

विसावदर विधानसभा मतदारसंघात आपनं विजय मिळवला. विसावदर मतदारसंघ भाजपसाठी आव्हानात्मक ठरला आहे. या जागेवर भाजपला शेवटचा विजय 2007 मध्ये मिळाला होता. 2007 मध्ये भाजपच्या भलाला कुनभाई यांनी 45.16 टक्के मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर भाजपला या जागेवर विजय मिळवता आलेला नाही. 

2022 मध्ये आपचा विजय

गुजरात विधानसभेची निवडणूक 2022 मध्ये पार पडली होती. विसावदर या जागेवर आपनं विजय मिळवला होता. आपकडून भूपेंद्र भयानी यांनी विजय मिळवला होता. मात्र ,त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळं ही जागा रिकामी होती. पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीनं गुजरातमधील पक्षाचे वरिष्ठ नेते गोपाल इटालिया यांना उमेदवारी दिली होती. गोपाल इटालिया या जागेवर विजय मिळवण्यात यशस्वी ठरले.  

विसावदर जागा कुणी कधी जिंकली?

2002- भाजप2007- भाजप2012- जीजीपी2017- काँग्रेस2022- आम आदमी पार्टी2025 (उपचुनाव)- आम आदमी पार्टी

पोटनिवडणुकीचा निकाल?

आम आदमी पार्टीचे गोपाल इटालिया यांना ईव्हीएममधून 75906 आणि पोस्टल मतांपैकी  36  मतं मिळाली. गोपाल इटालिया यांना 75942 मतं मिळाली. त्यांना एकूण  51.04 टक्के मत मिळाली. भाजपच्या किरीट पटेल यांना ईव्हीएममधून 58325 आणि 63 पोस्टल मतं मिळाली. किरीट पटेल यांना एकूण 58388 मतं मिळाली. त्यांच्या मतांची टक्केवारी 39.24 राहिली. काँग्रेसच्या नितिन रणपारिया यांना 5501 मतं मिळाली. 

आपनं गुजरात आणि पंजाबमधील एक एक जागा मिळवली. केरळमधील एक जागा काँग्रेसनं, तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगालमधील एक जागा तर भाजपनं गुजरातमधील एक जागा जिंकली.