गुवाहाटी : आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये सीमावादावरुन संघर्ष पेटला असून त्याने हिंसक रुप धारण केलं आहे. नागरिक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या झडपेमध्ये गोळीबाराची घटना घडली असून त्यामध्ये सहा पोलीस कर्मचारी मृत्यूमुखी पडले आहेत तर 50 कर्मचारी जखमी झाले आहेत. या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये सुरु असलेल्या वादावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली असून दोन्ही राज्यांनी सीमेवर शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं आहे.
काय आहे सीमावाद? आसामच्या बराक घाटीतील कछार, करीमगंज आणि हैलाकांडी या तीन जिल्ह्यांच्या आणि मिझोरमच्या आयझॉल, कोलसिब आणि मामित या जिल्ह्यांची 164 किमीची सीमा लागून आहे. गेल्या वर्षी, ऑगस्ट 2020 मध्ये या दोन राज्यातील नागरिकांमध्ये सीमेवरुन वाद झाला होता.
आसाम आणि मिझोरम ही दोन्ही राज्ये पर्वतीय भागाची असून या राज्यांतील नागरिकांमध्ये जमिनीच्या लहान-लहान तुकड्यांवरुन नेहमी वाद होतो. नुकतंच आसामच्या पोलिसांनी मिझोरमच्या नागरिकांना या सीमेवर शेती करण्यासाठी बंदी आणली आणि त्यांना तिथून हाकलवून लावलं होतं. त्यामुळे या दोन्ही राज्यांत सीमावादावरुन नव्याने वाद निर्माण झाला आहे.
एटलांग नदीच्या परिसरातील आठ झोपड्यांना आसाम पोलिसांनी आग लावल्याचा आरोप मिझोरमच्या पोलिसांनी केला आहे. त्यामुळे मिझोरमच्या नागरिकांमध्ये असंतोष पसरल्याचं सांगण्यात येतंय. तर मिझोरमच्या नागरिकांनी आसामच्या पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप आसाम पोलिसांकडून करण्यात आला आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांचा शोकआसामच्या मुख्यमंत्र्यांनी सहा पोलिसांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला असून या सहा कर्मचाऱ्यांनी राज्याच्या सीमेचे रक्षण करताना बलिदान दिल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
या दोन राज्यांतील सीमावाद पेटला असताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. वादग्रस्त सीमेवर शांतता नांदावी आणि हा मुद्दा सहमतीने सोडवण्यात यावा असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Tokyo Olympics : भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर दणदणीत विजय, रूपिंदर पाल सिंह, सिमरनजीत विजयाचे मानकरी
- APJ Abdul Kalam Death Anniversary : भारताचे 'मिसाईल मॅन' अब्दुल कलामांच्या बाततीत 'या' दहा गोष्टी माहिती आहेत का?
- Petrol-Diesel Price : जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा वाढ, जाणून घ्या, आजचे दर काय?