गुवाहाटी : आसाममध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पोहोचल्यानंतर भाजप मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा सरकारकडून विरोध सुरुच आहे. रविवारी घडलेल्या घटनेनंतर आज सुद्धा (22 जानेवारी) कुरघोडीचे राजकारण सुरुच राहिले. नागाव जिल्ह्यातील बोर्डोवा थानमध्ये जाण्यावर ठाम असलेले राहुल गांधी यांना प्रवेश नाकारण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात न जाता सोमवारी दुपारी तीननंतर तेथे यावे, असे व्यवस्थापन समितीने म्हटले आहे. राहुल गांधी पोलिसांनी रोखल्यानंतर संतापले. राहुल गांधी यांनी विचारले की आज फक्त एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकते का? आम्हाला तिथे बोलावण्यात आले होते आणि आता तुम्ही जाऊ शकत नाही असे सांगितले जात आहे, मी का जाऊ शकत नाही याचे कारण विचारतोय? असे राहुल म्हणाले.






राहुल गांधी मंदिर प्रवेशावर ठाम


'मी का जाऊ शकत नाही? मी काय चूक केली आहे? मला फक्त जाऊन हात जोडायचे आहेत, आदर द्यायचा आहे. मी जाऊ शकत नाही, असे प्रशासन सांगत आहे, मग मी का जाऊ शकत नाही? अशी विचारणा राहुल यांनी केली. 


बारदोवाचे महत्व काय?


बारदोवा थान हे 15व्या-16व्या शतकातील सामाजिक-धार्मिक सुधारक आणि आसामी संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थान परिसरात वसलेले आहे. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जोगेंद्र नाथ देव महंत यांनी रविवारी दुपारी बारदोवाचे काँग्रेस आमदार शिबामोनी बोरा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अनेक संस्थांनी भक्तिमय कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.


काय म्हणाली बार्दोवा थान समिती?


बार्दोवा थान समितीने सांगितले की, 'त्या ठिकाणी हजारो लोक येण्याची अपेक्षा आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही गांधींना दुपारी 3 वाजण्यापूर्वी आवारात प्रवेश करू देऊ शकत नाही. महंत म्हणाले, ' राहुल गांधी यांच्या भेटीबाबत बोरा यांचे पत्र आम्हाला मिळाले असून आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो, मात्र आम्ही त्यांना दुपारी 3 वाजेपूर्वी आवारात प्रवेश करू देऊ शकत नाही.'


काय म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?


यापूर्वी आज आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 22 जानेवारी रोजी बारदोवा येथील श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानाला भेट देणे टाळावे. ते म्हणाले की, प्रभू राम आणि मध्ययुगीन वैष्णव संत यांच्यात स्पर्धा होऊ शकत नाही. हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले की, राहुल गांधींनी अनावश्यक स्पर्धा निर्माण करू नये, हे आसामसाठी दुःखदायक असेल.


इतर महत्वाच्या बातम्या