Assam Flood Update : आसाममध्ये पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. राज्यातील 26 जिल्ह्यांतील चार लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. पुराची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून बचावकार्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.


गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'आसामच्या काही भागात मुसळधारमुळे निर्माण झालेली पूरस्थिती चिंताजनक आहे. आसाममधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांच्याशी संपर्क साधला. बचावकार्यासाठी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहे.' केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. आसाम जिल्हा प्रशासनाने 89 मदत छावण्या आणि 89 वितरण केंद्रे स्थापन केली असून तेथे 39 हजार 558 पूरग्रस्त लोक आश्रय घेत आहेत.






कचार जिल्ह्यात लष्कराकडून बचावकार्य सुरु
कचार जिल्ह्यात परिस्थिती गंभीर झाल्याने इथे बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाने मंगळवारी कचार जिल्ह्यातील विविध भागात बचावकार्य सुरू केलं आहे. संरक्षण विभागाने सांगितले की, कचार जिल्ह्याच्या उपायुक्तांकडून विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या तुकड्या पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी तात्काळ रवाना करण्यात आल्या. महिला, वृद्ध आणि लहान मुलांना बचावकार्यात प्राधान्य देण्यात आलं. तातडीने बचावकार्य सुरु केल्याने अनेकांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला. आसाम रायफल्सच्या श्रीकोना बटालियन आणि लष्कराच्या जवानांनी एकूण 500 गावकऱ्यांची सुटका केली.






26 जिल्ह्यांमध्ये पूर, 4 लाखांहून अधिक लोक बाधित
आसाममधील 26 जिल्ह्यांमध्ये 4.03 लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, कचार जिल्ह्यात एकूण 96 हजार 697 लोकांचं पुरामुळे नुकसान झालं आहे. होजईमध्ये 88 हजार 420, नागावमध्ये 58 हजार 975, दरंगमध्ये 56 हजार 960, विश्वनाथमध्ये 39 हजार 874 आणि उदलगुरी जिल्ह्यात 22 हजार 526 लोक पुरामुळे बाधित झाले आहेत. 


कचर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू
कचर जिल्ह्यात पुरामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन मुलांसह तीन जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय जोरहाट जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे.जिल्हा प्रशासनाकडून 55 मदत केंद्र आणि 12 वितरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये 32 हजार 959 पूरग्रस्त लोक आश्रय घेत आहेत. 


अनेक गावांमध्ये दरड कोसळल्या
मुसळधार पावसामुळे न्यू कुंजांग, फ्यांगपुई, मौलहोई, नामजुरंग, दक्षिण बागेतर, महादेव टिला, कालीबारी, उत्तर बागेतर, जिओन आणि लोदी पांगमौल या गावांमध्येही भूस्खलन झालंआहे. दरड कोसळल्याने जटिंगा-हरणगाव आणि माहूर-फिडिंग येथील रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या