Ashok Gehlot Cabinet : राजस्थानच्या नव्या मंत्रिमंडळाचा आज, रविवारी शपथविधी होणार आहे. यामध्ये 15 नेत्यांना शपथ दिली जाणार आहे. यामध्ये 11 कॅबिनेट मंत्री असणार आहेत. ज्यामध्ये 8 नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहेत. तर तीन राज्य मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बडती देण्यात आली आहे. याशिवाय, चार नेत्यांना राज्य मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.


ममता भूपेश, टीका राम जूली आणि भजन लाल जाटव यांचं प्रमोशन झालं आहे. राज्यमंत्री पदावरुन कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाली आहे. हेमा राम चौधरी आणि रमेश मीणा यांना सचिन पायलट गटाकडून मंत्रिपद देण्यात आलं आहे. बृजेंद्र ओला आणि मुरारी मीणा यांना सचिन पायलट गटातील राज्यमंत्रिपद देण्यात आलेय. राजेंद्र गूढा यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलेय. बीएसपीमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सहा आमदारांपैकी गूढा एक आहेत.  विश्वेंद्र सिंह यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलेय. याशिवाय रमेश मीणा यांना पुन्हा कॅबिनेटपद मिळालं आहे. 






दरम्यान, शनिवारी मंत्रिमंडळातील नेत्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे दिला. राजस्थानमध्ये गेहलोत विरुद्ध पायलट असा सत्तासंघर्ष सुरु झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या सत्ता संघर्षात काही नेत्यांना आपली मंत्रिपद गमवावं लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  दरम्यान, रविवारी दुपारी 4 वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे प्रभारी अजय माकन हे राजस्थानमध्ये पोहोचले आहेत.


काँग्रेस नेते सचिन पायलट हे आधीच अशोक गहलोत यांच्या कारभारावर नाराज आहेत.  गेल्या वर्षी राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. पायलट आणि त्यांच्या 19 समर्थक आमदारांनी ही बंडखोरी केली होती. सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. राजस्थान हे काँग्रेसच्या हातात असलेलं मोठं राज्य आहे. या राज्यात भाजप पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर सचिन पायलट यांनाही मुख्यमंत्रीपदाची इच्छा आहे. त्यामुळे आता पंजाबप्रमाणे राजस्थामध्येही राजकीय भूकंप होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.