नवी दिल्ली: 'या पूर्ण निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोघांनीही सत्तेचा दुरुपयोग केला. अनेक ठिकाणी मंत्री चक्क धमक्या देत होते. भाजपला मतदान नाही केलं तर तुमच्या भागाला निधी मिळवून देणार नाही.' असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर थेट भाजप-शिवसेनेवर टीका केली. दिल्लीत एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.
'निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी वाईट नाही'
नगरपालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवरील प्रश्न महत्वाचे असतात. त्यामुळे या विजयाचं भाजप चुकीच्या पद्धतीनं प्रमोशन करत आहेत. भाजपला जरी जास्त यश मिळालं असलं तरीही काँग्रेसचीही कामगिरी वाईट नाही. मला मान्य आहे की, यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करता आली असती. पण निवडणूक आहे त्यात हार-जीत होतच असते.
'नगरसेवकांच्याबाबतीत आम्ही दुसऱ्या क्रमांकावर'
'नगरसेवकांच्या बाबतीत आमची स्थिती चांगली आहे. भाजपपाठोपाठ आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. मात्र, नगराध्यक्ष पदामध्ये आम्ही कमी पडलो हे मान्य करायला हवं. स्थानिक नेतृत्वानं ज्या ठिकाणी लक्ष दिलं तिथं रिझल्ट पाहायला मिळाला.'
'राणेंचा रोख नेमका कोणाकडे मी सांगू शकत नाही'
'काल नारायण राणे यांनी केलेला आरोप खरंच गंभीर आहे. पण राणेंचा रोख नेमका कोणाकडे हे मी सांगू शकत नाही. अशाप्रकारे कोणी पैसे घेत असल्याचं त्यांनी दाखवून द्यावं. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करेन. राणेचं म्हणणं मी गंभीरपणे घेतलं आहे.'
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यांच्यातला वाद आता काही लपून राहिलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या या दोन नेत्यांमधून विस्तव जात नाहीय. मात्र त्यांच्यातला हा वाद मिटवण्यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.