नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही एक नवीन कार्यक्रम सुरु केला आहे. दर महिन्याला रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधतात. पण आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'टॉक टू AK' हा नवा कार्यक्रम आजपासून दिल्लीत सुरु होत आहे. या कार्यक्रमाची वेळ सकाळी ११ वाजता आहे. हा कार्यक्रम महिन्यातून किती दिवस प्रसारित करण्यात येणार याबाबत दिल्ली सरकारने स्पष्ट केले नसले तरी, हा कार्यक्रम मोदींच्या 'मन की बात'प्रमाणेच महिन्यातून एकदाच प्रसारित करण्यात येईल असे बोलले जात आहे.


 

प्रसिद्ध संगितकार विशाल ददलानी या कार्यक्रमात मॉडरेटरची भूमिका साकारणार आहे. या कार्यक्रमावेळी अरविंद केजरीवाल कार्यक्रम निर्मात्यांनी आणि दिल्ली सरकारने ठरवलेल्या प्रश्नांसोबतच फोन इन कॉलमधील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.

 

मुख्यमंत्री केजरीवालांना प्रश्न विचारता यावेत, यासाठी 011-23392999 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय या कार्यक्रमासाठी talktoak.com ही नवी वेबसाईटही सुरु करण्यात आली आहे. तसेच +91-81303344141 या क्रमांकावर एसएमएस करून प्रश्न विचारता येणार आहेत.

 

हा कार्यक्रम दिल्ली सचिवालयात रेकॉर्ड होणार असून, यूट्यूब आणि वेबसाईटवरही हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमावरून राजकारणासही सुरुवात झाली असून भाजपने विशाल ददलानी यांच्या लोकप्रियतेचा आधार घेऊन कार्यक्रम हिट करण्याच्या प्रयत्नात केजरीवाल असल्याचे बोलले जात आहे.

 

दरम्यान, असे असले तरी या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने प्रश्न विचारण्यात येत आहेत. पण यामधील कोणत्या प्रश्नांना केजरीवाल उत्तरे देणार हे गुलदस्त्यातच आहे. पण हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमातून संकल्पना घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.