Punjab Assembly Election 2022 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. ’जर आमचं सराकर आलं तर 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला प्रति महिना एक हजार रुपये देऊ,’ अशी घोषणा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केली आहे. सोमवारी केजरीवाल मोगा येथील रॅलीला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, “ आमचं सरकार पंजाबमध्ये सत्तेत आलं तर प्रत्येक महिलेला प्रति महिना एक हजार रुपये देऊ. जर कुटुंबात सासू, सून आणि मुलगी असेल तर तिघींच्या बँक खात्यात हजार-हजार रुपये जमा होतील. ज्या महिलांना वयोवृद्ध पेन्शन मिळत आहे, त्यांच्याही खात्यात पेन्शनशिवाय एक हजार रुपये जमा केले जातील. हा जगातील सर्वात मोठा महिला सबलीकरण कार्यक्रम आहे. पंजाबमधील निवडणुकीत महिलाच ठरवतील कुणाला मतदान करायचं.” 






निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचं पाऊस पडताना दिसत आहे. यामध्ये केजरीवाल यांचीही भर पडली आहे. पुढील वर्षी पंजाब, उत्तर प्रदेश, गोव्यामध्ये विधानसभा निवडणूका (Assembly Election 2022) होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांकडून घोषणांचा पाऊस पडत आहे. अरविंद केजरीवाल सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर मतदारांना आकर्षीत करण्यासाठी केजरीवाल यांनी रिक्षा चालकाच्या घरी जेवणही केलं. 


मोगा येथील ऱॅलीला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की,  “ पंजाबमध्ये सध्या एक नकली केजरीवाल फिरत आहे. मी जे काही जाहीर करतो तेच ही व्यक्ती दुसऱ्या दिवशी घोषणा करते. मात्र, या नकली केजरीवालपासून सावध राहा. तुम्हाला दिलेली आश्वासनं केवळ हा असली केजरीवालच पूर्ण करेल.” असं म्हणत केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर निशाणा साधलाय. 






LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha