नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं आज 66 व्या वर्षी निधन झालं. जेटली यांच्या जाण्याने त्यांनी केलेली कामं आणि त्यांच्या आठवणी समोर येत आहेत. अरुण जेटली यांचं राजकारणाव्यतिरिक्त क्रिकेटवर खास प्रेम होतं. त्यांचे अनेक क्रिकेटर्ससोबत चांगले संबध होते.


अरुण जेटली यांनी वीरेंद्र सेहवागपासून सध्याचा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेकांनाा मदत केली. शिखर धवन, इशांत शर्मा, गौतम गंभीर यांसारख्या यशस्वी क्रिकेटर्सची करिअर घडवण्यात अरुण जेटलींचं मोठं योगदान होतं, असं बोललं जातं.


अरुण जेटली डीडीसीएचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे उपाध्यक्षही होते. ते क्रिकेटर्सना नेहमीच प्रोत्साहत देत असत. चांगले खेळाडू भारतीय संघात समाविष्ट व्हावे, यासाठी जे खेळाडू चांगलं प्रदर्शन करत असे, त्यांच्यासाठी ते स्वत:हून बीबीसीआयशी बोलत असत, असंही बोललं जातं. यातून त्यांची क्रिकेटविषयची आपुलकी दिसत.



एकदा आशिष नेहरा खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यावेळी त्याला चांगले उपचार मिळावे यासाठी अरुण जेटली यांनी प्रयत्न केले होते. आशिष नेहराने दुखापतीतून सावरुन भारतीय संघात पुनरागमन केलं.


वीरेद्र सेहवागचं लग्न तर अरुण जेटली यांच्या बंगल्यावरच झालं होतं. एकदा सेहवागने दिल्ली संघ सोडून हरियाणा संघाकडून खेळण्याची तयारी केली होती. अरुण जेटली यांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी स्वत: सेहवागशी चर्चा केली आणि त्याचं मतपरिवर्तन केलं. अशारीतीने अरुण जेटली यांनी क्रिकेट आणि क्रिकेटर्ससाठी अनेक चागंली कामं केली.