नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे, अशी टीका करणाऱ्यांना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिलं. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी नाव न घेता उत्तर दिलं. यशवंत सिन्हांना वयाच्या 80 व्या वर्षीही पदाची लालसा आहे, असा टोला जेटलींनी नाव न घेता लगावला.


जेटली ‘इंडिया@70 मोदी@3.5’ या पुस्तक विमोचन कार्यक्रमात बोलत होते. 70 वर्षांचा भारत, तीन वर्षांचं मोदी सरकार आणि वयाच्या 80 व्या वर्षीही रोजगार, असं या पुस्तकाचं शीर्षक हवं होतं, असं म्हणत जेटलींनी यशवंत सिन्हांना टोला लगावला.

देशात चर्चा असलेल्या कथित मंदीला कशाचाही आधार नाही, असा दावा जेटलींनी केला. नोटाबंदीला विरोध करणारे काळ्या पैशाचे समर्थक आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होत आहे. यासाठी सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत, असं अरुण जेटली म्हणाले.

जीएसटी लागू करण्यासंदर्भातले निर्णय हे सर्वसहमतीने घेण्यात आले. डायरेक्ट टॅक्स गेल्यावर्षीच्या तुलनेत 15.7 टक्के जास्त आला आहे. राजकीय पक्षांना मिळणारा निधीही पारदर्शक व्यवहारांच्या निकषांमध्ये यावा यासाठी सरकार काम करत आहे, असंही जेटलींनी सांगितलं.

यशवंत सिन्हांचा सरकारला घरचा आहेर

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे मोदी सरकारवर हल्ले सुरुच आहेत.

नोटबंदीच्या परिणामांची शहानिशा न करताच जीएसटी लागू करण्याची घाई केली, असा हल्लाबोल यशवंत सिन्हा यांनी आज केला.

सिन्हा यांनी काल नोटाबंदी म्हणजे मंदीच्या आगीत तेल ओतण्यासारखं असल्याचं म्हणत मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. त्यानंतर आज त्यांनी जीएसटीवरुन सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

संबंधित बातमी : नोटाबंदीनंतर लगेचच जीसएटी का? यशवंत सिन्हांचे हल्ले सुरुच