नवी दिल्ली : कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणाऱ्या व्यापाऱ्यांना 2 टक्क्यांची सूट जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. चलनातून रद्द झालेल्या नोटांमध्ये कोणतीही तफावत नसल्याचंही जेटलींनी स्पष्ट केलं.
दोन कोटींपर्यंत उलाढाल असणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. लघु व्यावसायिकांना करामध्ये सवलत देण्याची घोषणा सरकारनं केली आहे. कॅशलेस व्यवहारांसाठी आणखी पर्याय उपलब्ध करणार असल्याची माहितीही जेटलींनी दिली.
नोटाबंदीनंतर नेमक्या किती नोटा चलनातून बाद झाल्या, याविषयी निर्माण झालेल्या आकडेवारीच्या गोंधळावरही जेटलींनी स्पष्टीकरण दिलं आहे. नोटाबंदीआधी पाचशे आणि हजाराच्या नोटा मिळून एकूण 18 लाख कोटी चलनात होते. त्यापैकी 15 लाख 44 हजाराच्या नोटा बाद झाल्या आहेत.
उर्वरित रक्कम ही रिझर्व्ह बँकेकडेच पडून असल्यानं ती चलनात आलीच नाही, त्यामुळे चलनातून रद्द झालेल्या नोटांमध्ये कोणतीही तफावत नाही, असं जेटलींनी स्पष्ट केलं.
जुन्या नोटा असल्याच एकाच वेळी भरा, रोज रोज खात्यात डिपॉझिट केल्यास संशय बळावतो, असंही अरुण जेटली म्हणाले. नोटाबंदीच्या काळात बँकांनी चांगलं काम केलं, दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होणार असं आश्वासनही त्यांनी दिलं.