Election Commission Of India: देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे लोकसभेच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनीही अरुण गोयल (Arun Goel) यांचा राजीनामा मंजूर केला. तीन सदस्य असलेल्या निवडणूक आयोगामध्ये आधीपासूनच एका आयुक्ताचं पद रिक्त होतं. आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर केवळ मुख्य निवडणूक आयुक्त आयोगामध्ये शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे, अरुण गोयल यांनी कार्यकाल संपण्याच्या तीन वर्ष आधीच राजीनामा दिल्यानं जोरदार चर्चा सुरू आहे.
काही दिवसांतच आगामी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. सध्या देशाची धुरा सांभाळत असलेल्या केंद्र सरकारचा कार्यकाळ जून महिन्यात संपत आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाला देशभरात लोकसभा निवडणुका घ्यायच्या आहेत. आगामी 18व्या लोकसभेसाठी प्रतिनिधींची निवड करायची आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग कधीही लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतं. पुढील आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसं झालं तर मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर मात्र मोठा पेच असणार आहे. अनुप चंद्र पांडे यांची निवृत्ती आणि अरुण गोयल यांनी दिलेला राजीनामा यांमुळे आता सर्व धुरा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या एकट्याच्याच खांद्यावर असणार आहे, असं चित्र दिसतंय.
सध्या निवडणूक आयोगात राजीव कुमार हे एकमेव निवडणूक आयुक्त आहेत. सर्वसाधारणपणे निवडणूक आयोगात तीन निवडणूक आयुक्त असतात, मात्र आता दोन निवडणूक आयुक्तांची जागा रिक्त आहे. अरुण गोयल यांचा राजीनामा आणि अनुप चंद्र पांडे यांच्या निवृत्तीनंतर दोन निवडणूक आयुक्तांची पदे रिक्त झाली आहेत. अशातच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना लोकसभा निवडणुकीची धुरा एकट्यानंच सांभाळावी लागणार आहे.
नव्या निवडणूक आयुक्तांची निवड कशी होणार?
नव्या निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीमध्ये पंतप्रधान, एक कॅबिनेट मंत्री (जे पंतप्रधान निवडतात) आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश होतो. ही समिती निवडणूक आयुक्तपदासाठी नावाची शिफारस करते. या शिफारशीच्या आधारे राष्ट्रपती नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करतात. निवडणूक आयुक्तांचा एकूण कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. मुख्य निवडणूक आयुक्तांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांचं निवृत्तीचं वय 62 वर्ष आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :