नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर कलम 370 वरुन भारतविरोधी भूमिका घेणे मलेशियाला चांगलच महागात पडणार आहे. मलेशियाकडून कुठल्याही स्थितीत खाद्यतेल आयात न करण्याचा निर्णय व्यापारी संघटनेनं घेतला आहे. मलेशियाला धडा शिकवण्यासाठी अशी भूमिका घेतल्याचं व्यापारी संघटनेनं म्हटलं आहे.


मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द केल्यानंतर मलेशियाने त्याचा विरोध केला होता. मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा कलम 370 रद्द करण्याचा निर्णय हा आततायी असल्याची टीका केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी भूमिका घेत मलेशियाने एकप्रकारे पाकिस्तानचं समर्थन केलं होतं.


मलेशिया हा जगातला सर्वाधिक पामतेल किंवा खाद्यतेल उत्पादन करणारा देश आहे. तर भारत हा मलेशियाकडून सर्वात जास्त तेल आयात करणारा देश आहे. भारताने जानेवारी ते सप्टेबर या काळात 3.9 मिलियन टन तेल मलेशियाकडून आयात केलं होतं. हा व्यवहार दोन अब्ज डॉलरचा होता.


सर्व प्रकारच्या खाद्यतेलाची भारताची वार्षिक गरज ही 210 लाख टन इतकी आहे. त्यातील जवळपास 150 लाख टन खाद्यतेल आपण आयात करतो. त्यात पामतेलाचं प्रमाण हे 95 लाख टन इतकं आहे. यापैकी सर्वाधिक पामतेल भारत मलेशियाकडून आयात करतो. याशिवाय इंडोनेशिया आणि थायलंडकडूनही पामतेलाची आयात होते.