मुंबई : सोशल मीडियावर काश्मीरी वकील दीपिका राजावत यांच्या अटकेची मागणी होत आहे. ट्विटरवर #Arrest_Deepika_Rajawat हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. या ट्रेण्डच्या माध्यमातून ट्विटराईट दीपिका यांच्याविरोधात ट्वीट करत असून आतापर्यंत हजारो ट्वीट करण्यात आले आहेत. पण दीपिका राजावत यांना अटक करण्याची मागणी अखेर का होत आहे? जाणून घेऊया याचं कारण.





काश्मीरी वकील दीपिका राजावत यांनी सोमवारी (19 ऑक्टोबर) रात्री आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक फोटो ट्वीट केला. या फोटोतून त्यांनी समाजातील विडंबन दाखवलं आहे. नवरात्रीत मुलींची परिस्थिती कशी असले आणि इतर दिवशी कशी असं त्यांनी फोटोमधून सांगितलं आहे. या फोटोला 'विडम्बना' असं कॅप्शन दिलं आहे. परंतु देवीची पूजा करणारे बलात्कारी असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यामुळेच त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे.


या ट्वीमुळे लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दीपिका राजावत या हिंदू धर्माचा अपमान करणारी स्त्री असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याने त्यांना अटक करावी अशी मागणी करत आहेत.














कोण आहेत दीपिका राजावत?
दीपिका राजावत कश्मीरी वकील आहेत. जम्मू काश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर त्या प्रसिद्धीच्या झोकात आल्या होत्या. कठुआ बलात्कार आणि हत्या खटल्यात त्या पीडित कुटुंबाच्या वकील होत्या. या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका निभावली होती. परंतु त्यांना 2019 मध्ये त्यांना या खटल्यातून हटवलं होतं.



पीडितेच्या कुटुंबाने वकील दीपिका राजावत यांना या खटल्यातून हटवण्यासाठी पठाणकोट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी कोर्टाने स्वीकारली. त्यावेळी पीडितेच्या कुटुंबाने आरोप केला होता की, "दीपिका राजावत वकील म्हणून या प्रकरणात केवळ प्रसिद्धी मिळवत आहेत, परंतु त्यांचा या खटल्यात रस नाही आणि त्या कोर्टातही येत नाहीत." यानंतर वकील फारुकी खान यांनी ही केस घेतली आणि पुढची लढाई लढून पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला.


काय आहे कठुआ प्रकरण?
10 जानेवारी 2018 रोजी कठुआमध्ये एका आठ वर्षीय मुलीची कथितरित्या अपहरण झालं होतं. त्यानंतर 17 जानेवारी रोजी ती मृतावस्थेत सापडली होती. तिच्यावर सामूहिक बलात्कार तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पठाणकोटच्या विशेष न्यायालयाने सहा जणांना दोषी ठरवलं. त्यापैकी तिघांना जन्मठेप आणि तिघांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.


Kathua Rape Case | कठुआ बलात्कार प्रकरणी तीन दोषींना जन्मठेप, तिघांना पाच वर्षांचा कारावास | ABP Majha