नवी दिल्ली: काश्मीरमध्ये आझादीच्या नावे हिंसाचार भडकवणाऱ्यांना लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी कडक इशारा दिला आहे. ‘आझादी’चं स्वप्न दाखवून तरुणांना दिशाभूल केलं जात आहे. मात्र बंदूक उचलून आझादी मिळणार नाही. जर तुम्ही आमच्याशी लढत असाल, तर आम्हीही पूर्ण ताकदीने उत्तर देऊ, असं बिपीन रावत म्हणाले.


इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत बिपीन रावत यांनी फुटीरतावाद्यांना इशारा दिला.

बिपीन रावत यांनी काश्मीरमधील तरुणाईबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “बंदूक उचलून आझादी मिळेल, असं जे लोक तरुणांना सांगत आहेत, ते त्यांची दिशाभूल करत आहेत. यातून त्यांना काहीही मिळणार नाही. तुम्ही भारतीय सैन्याचा सामना करु शकणार नाही.”

गोळीबाराने नव्हे तर चर्चेने प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी राजकीय नेते, प्रतिनिधींनी गावागावात जाऊन विशेषत: दक्षिण काश्मीरमध्ये नागरिकांशी चर्चा करावी. मात्र तिथल्या लोकांना वाटतं की हे आमच्यावर हल्लेच करतील. पण चर्चा झाल्याशिवाय मार्ग निघणार नाही, असं बिपीन रावत यांनी नमूद केलं.

तो विश्वास कोण देणार?

बिपीन रावत म्हणाले, “आम्ही मिलिट्री ऑपरेशन संपवायला तयार आहोत. मात्र जवानांवर गोळीबार होणार नाही याची खात्री कोण देणार? पोलीस, राजकीय व्यक्ती किंवा आमचे सुट्टीवर येणारे सैनिक, यांच्या सुरक्षेची हमी कोण देणार? असे सवाल रावत यांनी विचारले.