नवी दिल्ली : काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अप्सरा रेड्डी यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फोटो ट्वीट करुन याबाबत घोषणा केली.

महिला काँग्रेस अध्यक्षा सुषमा देव यांच्या उपस्थितीत अप्सरा रेड्डी यांना महासचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला. ट्रान्सजेंडर व्यक्तीला एखाद्या राजकीय पक्षात महत्त्वाची जबाबदारी बहाल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 132 वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेसने हे अनोखं पाऊल उचलल्यानंतर सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

अप्सरा रेड्डी यांनी मे 2016 मध्ये 'एआयएडीएमके' पक्षात प्रवेश केला होता. जयललिता यांच्या निधनानंतर त्या शशिकला यांच्या कंपूत शिरल्या. त्यानंतर रेड्डी भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या, मात्र तिथे आपण फक्त फोटोपुरत्या राहिलो होतो, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

'ट्रान्सजेंडर महिला काहीच करु शकत नाहीत, असं मी आजवर ऐकत आले आहे. मात्र देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश करणं हा अत्यंत भावनिक क्षण आहे' अशा भावना तिने व्यक्त केल्या.

अप्सरा रेड्डी यांनी ब्रॉडकास्ट जर्नलिझमची पदवी मिळवली आहे. शोधपत्रकारितेमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलं होतं. त्यानंतर त्यांनी काही वृत्तपत्रांमध्ये नोकरीही केली आहे.