अहमदाबादच्या न्यायालयात नॅशनल हेरॉल्डमध्ये राफेल सौद्याबाबत प्रसिद्ध केलेल्या लेखाविरोधात रिलायन्स समूहाने हा दावा दाखल केला होता. या खटल्यावर अहमदाबादचे सिव्हिल आणि सेशन न्यायाधीश पी. जे. तमकुवाला यांच्या कोर्टात कामकाज सुरु होते. आम्ही प्रतिवाद्यांना त्यांच्यावरील खटले मागे घेत असल्याबाबत सूचित केलं आहे, अशी माहिती अंबानींचे वकील राकेश पारिख यांनी कोर्टात दिली.
मानहानीचा खटला मागे घेण्याबाबत सूचना मिळाल्या आहेत. कोर्टाच्या सुट्ट्या संपल्यानंतर हा खटला मागे घेण्याबाबतची औपचारिक कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे नॅशनल हेराल्ड आणि काँग्रेस नेत्यांचे वकील पी एस चंपानेरी यांनी सांगितले.
अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स डिफेंसकरवी काँग्रेस नेते सुनील जाखड, रणदीप सिंह सुरजेवाला, ओमन चांडी, अशोक चव्हाण, अभिषेक मनु सिंघवी, संजय निरुपम यांच्या विरोधात सिव्हिल मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या नेत्यांसोबत नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र आणि काही पत्रकारांच्या विरोधात देखील खटला दाखल केला होता.
नॅशनल हेरॉल्डमध्ये 'अनिल अंबानी यांनी मोदींकडून राफेल सौद्याची घोषणा होण्याच्या 10 दिवस आधी रिलायन्स रिलायंस डिफेंस कंपनी बनवली होती', अशा आशयाचा लेख छापून आला होता.