हैदराबाद : नव्या आंध्र प्रदेश राज्याच्या तीन अधिकृत राजधान्या असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री जगनमोहन रेंड्डी यांनी केली आहे. सत्तेचं आणि कामकाजांचं विकेंद्रीकरण करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. हैदराबाद हीच सध्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांची राजधानी आहे. परंतु आता आंध्र प्रदेशने स्वतःची वेगळी राजधानी निर्माण करत असल्याची घोषणा केली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी विधानसभेत माहिती दिली की, आंध्र प्रदेश राज्याच्या तीन राजधान्या असतील. या तीन राजधान्यांमधून वेगवेगळ्या प्रकारची कामं केली जातील. कार्यकारी (executive), न्यायिक (judicial), राजकीय (lagislative ), अशा तीन प्रकारच्या राजधान्या असतील. तीन वेगवेगळ्या शहरांची त्यासाठी निवड केली जाणार आहे.
विधानसभेत राज्याच्या राजधानीबाबत मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली. रेड्डी म्हणाले की, अमरावती ही राजकीय (lagislative ) राजधानी असेल. अमरावतीमधून विधीमंडळाचं कामकाज केलं जाईल. विशाखापट्टणम ही कार्यकारी (executive) राजधानी असेल. कुरनूल शहर हे आंध्र प्रदेशची न्यायिक (judicial) राजधानी असेल. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कामकाज येथूनच चालेल.
जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले की, राज्याच्या तीन राजधान्या असाव्यात, असा आमचा विचार आहे. त्याची आम्हाला आवश्यकता वाटते. यावर आम्ही गंभीरतेने विचार करत आहोत. याचवेळी रेड्डी यांनी असेही सांगितले की, तीन राजधान्यांबाबत विचार करण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. येत्या काही दिवसांमध्ये समितीचा अंतिम अहवाल येईल.
दरम्यान, यावेळी रेड्डी यांनी सचिवालय आणि विभागीय कार्यालयं लवकरच विशाखापट्टणममध्ये स्थलांतरित केले जाण्याचे संकेत दिले आहेत. रेड्डी म्हणाले की, विशाखापट्टणम हे उत्कृष्ट बंदर आहे. तिथली व्यवस्था चांगली आणि चोख आहे. तिथे केवळ मेट्रोची आवश्यकता आहे.