हैदराबाद : जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताच आरोग्य विभागात कार्यरत आशा कार्यकर्त्यांना खुशखबर दिली आहे. आशा सेविकांचं मानधन तिपटीहून अधिक केलं आहे. आशा सेविकांचं मानधन तीन हजार रुपयांवरुन थेट दहा रुपयांवर नेण्यात आल्यामुळे त्यांना सरसकट सात हजारांचा फायदा होणार आहे.

जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सत्तेत आल्यास आशा कार्यकर्त्यांचं मानधन वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आपल्या शब्दाला जागत रेड्डींनी आशा सेविकांचं मानधन दहा हजारांवर नेलं. तर आंध्र प्रदेशातील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजारांचं निवृत्तीवेतन देण्याची घोषणाही त्यांनी केली.

नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. अंगणवाडी सेविकांचं मानधन तीन हजारांवरुन 4 हजार 500 रुपये करण्यात आलं होतं, तर अंगणवाडी सहाय्यकांचं मानधन दीड हजारांवरुन 2200 रुपये करण्यात आलं होतं.



विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला एकहाती विजय मिळवून देणारे पक्षाचे शिल्पकार वायएस जगनमोहन रेड्डी यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल ईएसएल नरसिम्हा यांनी जगनमोहन रेड्डींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने 175 पैकी 151 जागा मिळवत तेलुगू देसम पक्षाला धूळ चारली होती.

विजयवाड्यातील आयजीएमसी स्टेडियममध्ये वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषात रेड्डींचा शपथविधी पार पडला. जगनमोहन रेड्डींनी तेलुगू भाषेतून शपथ घेतली होती. आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायुडू मुख्यमंत्री झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही वायएसआर काँग्रेसने आंध्रमधील 25 पैकी 22 जागा मिळवल्या होत्या.