Amlapuram Tension : आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलण्याच्या विरोधात तरुणांनी केलेल्या विरोधामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. तरुणांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. इतकंच नाही तर आंदोलकांनी परिवहन मंत्री विश्वरुप यांच्या घरावर धडक दिली आणि घर आगीच्या भक्ष्यस्थानी केलं. कोनासीमा परिरक्षण समिती, कोनसीमा साधना समिती, कोनासीमा उद्यम समिती आणि अन्य संघटनांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि घोषणाबाजी करत परिसराला वेढा दिला. कोनसीमा जिल्ह्याशिवाय याला दुसरं नाव नको, असं मत त्यांनी व्यक्त केलं.


कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलून बीआर आंबेडकर कोनासीमा जिल्हा करण्याच्या प्रस्तावाविरोधात मंगळवारी (24 मे) आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. इथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाबची झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी केलेल्या लाठीचार्जनंतर अमलापुरम जिल्ह्यात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी, अधिकारी जखमी झाल्याचं कळतं. आंदोलकांनी पोलिसांची गाडी आणि एका शाळेच्या बसला आग लावली.


वादाची पार्श्वभूमी
4 एप्रिल रोजी पूर्व गोदावरी जिल्ह्यापासून कोनासीमा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मागील आठवड्यात राज्य सरकारने कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलून  बीआर आंबेडकर कोनासीमा जिल्हा करण्याची प्राथमिक सूचना जारी केली. परंतु यामुळे वादाला निमंत्रण मिळालं. कोनासीमा साधना समितीने नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवत जिल्ह्याचं सध्याचं नाव कायम ठेवण्याची मागणी केली. या समितीने मंगळवारी (25 मे) जिल्ह्याचं नाव बदलण्याच्या विरोधात जिल्हाधिकारी हिमांशू शुक्ला यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करत असताना हे आंदोलन केलं. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक भडकले आणि अखेर शांत अमलापुरममध्ये जाळपोळीची घटना घडली.


अखेर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये नेलं. या लाठीचार्जमुळे आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोनसीमा जिल्ह्याचं नाव न बदला तेच कायम ठेवावं अशी ठाम भूमिका घेतली. संघटनेने मंगळवारी 'चलो अमलापुरम'ची हाक दिली होती. परिणामी अमलापुरममध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक पाहायला मिळाले.