Minister Rajeev Chandrashekhar On Anantnag : काश्मीरमधील (Jammu & Kashmir) अनंतनागमध्ये (Anantnag Encounter Update) सुरू असलेल्या चकमकीवरून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे. अनंतनागमध्ये सुरु असलेल्या लष्करी कारवाईची पोस्ट रिट्वीट करत राजीव चंद्रशेखर यांनी पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "भारताचे अनेक शत्रू आहेत. आपल्याला रोखणं एवढंच त्यांचं ध्येय आहे. पण त्यांना माहीत असावं की, भारतीय सैन्याकडे आता हायटेक आणि घातक अद्ययावत हत्यारं आहेत. त्यामुळे कोणतीही चूक करू नका, भारतीय सैन्याच्या नादी न लागण्यातच शहाणपण असेल. यह न्यू इंडिया है. भारत न डरेगा, न पीछे हटेगा." तसेच, त्यांनी पुढे लिहिलंय की, भारतानं युद्ध पाहिलं आहे आणि आम्हाला युद्ध नको आहे. परंतु, जर तुम्ही भारताविरोधात युद्ध छेडलं तर मात्र तुमची मुलं अनाथ होतील.
अनंतनागमध्ये 5 दिवसांपासून चकमक सुरू
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये गेल्या 5 दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. येथे जंगलातील टेकड्यांमध्ये लष्करानं दहशतवाद्यांना घेरलं आहे. रॉकेट लाँचर आणि इतर घातक शस्त्रांचा वापर करून केलेल्या हल्ल्यात तीन दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दहशतवादी अजूनही लपून बसले आहेत. रविवारी (18 सप्टेंबर) सलग पाचव्या दिवशी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची कारवाई सुरूच आहे.
याच आठवड्यात मंगळवारी अनंतनागमध्ये दहशतवादी असल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर लष्करानं त्यांना घेरलं आणि कारवाई सुरू केली. बुधवारी (14 सप्टेंबर) झालेल्या चकमकीत 19 राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशिष धोनचक आणि काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून मुजम्मील भट्ट हे शहीद झाले. शुक्रवारी (16 सप्टेंबर) या कारवाईदरम्यान आणखी एक जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर आलं.
भारतातील G20 च्या यशानंतर पाकिस्तानी लष्कराच्या सुचनेनुसार काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांची योजना आखण्यात आली होती. येथे भारतीय लष्करही गुप्तचर माहितीच्या आधारे आधीच सतर्क होते. या आठवड्यात दहशतवाद्यांविरोधात खोऱ्यात पाच मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.
अनंतनागमधील दहशतवाद्यांच्या मागे पाकिस्तानच
अनंतनागमधील क्रॉस बॉर्डर कॉल इंटरसेप्टवरून या संपूर्ण हल्ल्यामागे पाकिस्तानचा कट असल्याचे समोर आलं आहे. भारताच्या G20 च्या यशामुळे संतप्त झालेल्या पाक लष्करानं काश्मीरमधील लष्करी तळांवर दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानात कायमस्वरूपी सरकार नाही. भारतीय लष्करानं सीमा ओलांडून सर्जिकल स्ट्राईक केला म्हणून पाकिस्तानी लष्कराला भारताला चिथावायचं आहे. यानंतर पाकिस्तानी लष्कराला त्यांच्या देशात लष्करी राजवट लागू करण्याचे निमित्त मिळेल. याआधीही लष्कराने पाकिस्तानात सरकार पाडून सत्ता काबीज केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Anantnag Encounter : अनंतनागमध्ये ऑपरेशन ऑलआऊट! पाचव्या दिवशीही चकमक सुरू