नवी दिल्ली : टिपू सुलतानच्या जयंतीवर मोदी सरकारमधील मंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या पत्रावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त कर्नाटक सरकारच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आपण हजर राहणार नसल्याचं पत्र अनंत कुमार हेगडे यांनी कर्नाटक सरकारला लिहिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त 10 नोव्हेंबर रोजी कर्नाटक सरकारच्या वतीने जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांना आमंत्रित केलं होतं.
पण या कार्यक्रमात आपण हजर राहणार नसल्याचं पत्र हेगडे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि उत्तर कर्नाटकच्या उपायुक्तांना लिहलं आहे.
अनंत कुमार हेगडे यांनी या पत्रात म्हटलंय की, “टिपू सुलतान हा क्रूर आणि हिंदू विरोधी शासक होता. त्याने म्हैसूर आणि कुर्गमधील हजोरो निष्पापांची हत्या केली होती. त्यामुळे त्याच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.”
हेगडे यांच्याकडून सातत्याने भडकाऊ वक्तव्य करुन, अनेक वाद ओढवून घेतले आहेत. यापूर्वी त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यात त्यांनी उत्तर कर्नाटकमधील एका रुग्णालयातील डॉक्टरला चोपलं होतं.
दरम्यान, टिपू सुलतानच्या जयंतीवरुन दरवर्षी नवनवे वाद निर्माण होत असतात. कर्नाटक सरकारच्या मते, टिपू सुलतान हा एक विकसनशील राजा होता. म्हैसूरच्या उभारणीत त्याची मोलाची भूमिका होती. तसेच राज्याला तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून अतिशय मजबूत केलं.
पण टीकाकारांच्या मते, त्याने श्रीरंगपट्टणममध्ये अनेक हिंदू पुजाऱ्यांची हत्या केली होती. श्रीरंगपट्टणम ही टिपू सुलतानच्या साम्राज्याची राजधानी होती.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टिपू सुलतानच्या जयंतीला हजर राहणार नाही, केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रानंतर नवा वाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Oct 2017 10:38 PM (IST)
टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त कर्नाटक सरकारच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आपण हजर राहणार नसल्याचं पत्र अनंत कुमार हेगडे यांनी कर्नाटक सरकारला लिहिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -