विधानसभा निवडणूक लढवणार नाही : आनंदीबेन पटेल
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2017 05:45 PM (IST)
आनंदीबेन पटेल या गुजरातमधील घटलोडिया विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. 1998 सालापासून त्या आमदार म्हणून राजकारणात कार्यरत आहेत.
गांधीनगर : गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आनंदीबेन पटेल यांनी थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहून कळवलं आहे. आनंदीबेन यांनी आपल्या वयाचं कारण देत, निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून केंद्रात गेल्यानंतर आनंदीबेन पटेल यांच्या खांद्यावर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र गेल्यावर्षी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी विजय रुपाणी यांची निवड झाली. आनंदीबेन पटेल या गुजरातमधील घटलोडिया विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. 1998 सालापासून त्या आमदार म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी अशी मागणी केली होती की, आनंदीबेन पटेल यांनाच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केलं पाहिजे. स्वामी यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची लोकप्रियता गुजरातमध्ये वेगाने वाढत आहे. मला वाटतं, भाजपला सहज विजय मिळवण्यासाठी आनंदीबेन पटेल यांनाच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनवलं पाहिजे.” आनंदीबेन पटेल या 1987 सालापासून भाजपशी जोडल्या आहेत. गुजरात सरकारमध्ये त्यांनी महसूल, अर्थ यांसह अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.