मुंबई : प्रसिद्ध उद्योजक आणि 'महिंद्रा ग्रुप'चे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपल्या कॉर्पोरेट बोर्डरुममधून प्लास्टिक बाटल्या हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्रा यांना ट्वीट करुन एका महिलेने नोंदवलेला आक्षेप या प्लास्टिकबंदीला निमित्त ठरला.

'दरवर्षी के. सी. एम. ई. टी शिष्यवृत्ती निवड हा माझ्यासाठी सर्वात उत्साहवर्धक कार्यक्रम असतो. या तरुणांची अफाट बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास हे अविश्वसनीय आहेत. या तरुणांच्या आशावादी दृष्टीकोनामुळे भविष्याबद्दलच्या सर्व चिंता दूर सारल्या गेल्या आहेत.' अशा आशयाचं ट्वीट शेअर करताना महिंद्रा यांनी दोन फोटोही सोबत जोडले होते.


आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटला उत्तर देताना एका महिलेने प्लास्टिकच्या बाटल्यांबद्दल नाराजी दर्शवली. 'बोर्डरुममध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टीलच्या बाटल्या असाव्यात, असं मला वाटतं. माझं फक्त एक निरीक्षण आहे सर' असं ट्वीट मीताली यांनी केलं.


महिंद्रा यांनी या ट्वीटला तात्काळ उत्तरही दिलं. 'प्लास्टिकच्या बाटल्यांवर लगेच बंदी घालण्यात येईल. त्या दिवशी आम्हालाही ते बघून लाज वाटली होती' असं आनंद महिंद्रा म्हणाले.


यापूर्वीही महिंद्रा यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांच्या वापराबाबत व्हिडिओ शेअर केला होता. दरवाजा बंद करण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा वापर केल्याच्या 'देसी जुगाडा'चं त्यांनी कौतुक केलं होतं.