यापूर्वी देशाने आनंद महिंद्रा यांचं दातृत्व पाहिलं आहे. शौर्य, धाडस, समाजभान आणि कर्तृत्व दाखवणाऱ्यांचा गौरव आनंद महिंद्र नेहमीच करत आले आहेत. त्यांनी केरळमधील एका मेहनती रिक्षाचालकाला महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक दिला होता. इतकंच नाही तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूलाही त्यांनी महिंद्राची TUV300 ही भारदस्त गाडी दिली होती.
त्यानंतर आता आनंद महिंद्रांनी मच्छिमार असलेल्या जैसलला बक्षीस म्हणून नवी कोरी महिंद्र मराझो भेट दिली आहे. केरळमधील कालिकत इथे केरळच्या कामगार मंत्र्यांच्या हस्ते ही कार जैसलला सोपवण्यात आली.
केरळचा बाहुबली
मच्छिमार असलेल्या जैसलने पुरात अडकलेल्यांना आपल्या बोटीतून सुरक्षित स्थळी पोहोचवलं होतं. महिला, मुलांना बोटीत जाता यावं यासाठी जैसलने बाहुबली सिनेमातील प्रसंगाप्रमाणे, स्वत:च्या पाठीची वाट करुन दिली होती. सोशल मीडियावर त्याचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.
गेल्या महिन्यात केरळमध्ये पुराने थैमान घातलं होतं. यामध्ये अनेकांचे जीव गेले. पण जैसलने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले. 32 वर्षीय मच्छिमार जैसलने एका वृद्ध महिलेला बोटीत चढण्यासाठी आपल्या पाठीचा आधार दिला होता. त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. जैसलने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत होतं.
या घटनेनंतर केरळचे कामगार मंत्री टी पी रामकृष्णन यांनी जैसलला सन्मानित करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर महिंद्रांनीही पुढाकार घेतला. आनंद महिंद्रा केवळ घोषणा करुन थांबले नाहीत तर त्यांनी नुकतीच लाँच झालेली महिंद्र मराझो देऊन त्याचा गौरव केला.
महिंद्र मराझो
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची नवी 'मराझो' ही गाडी या महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये लाँच करण्यात आली. एसयूव्ही सेगमेंटमधील ही नवी कार चार मॉडेलमध्ये उपलब्ध झाली आहे.
स्टाईलिश मराझोच्या बोल्ड लूकने कारजगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. शार्क माशाप्रमाणे या गाडीचं डिझाईन करण्यात आलं आहे.
या कारला 1.5 लिटर 4 सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे, जे 121 bhp पॉवर आणि 300 न्यूटन मीटर टॉर्क तयार करतो. इंजिनला 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. इतकंच नाही तर महिंद्रा आता या कारच्या पेट्रोल व्हर्जनवरही काम करत आहे.
संबंधित बातम्या
नाशिकमध्ये महिंद्राची मराझो गाडी लाँच, किंमत आणि सुविधा काय?
नाशिकमध्ये लाँच झालेली महिंद्राची 'मराझो' कशी आहे?