नवी दिल्ली : लोकसभेमध्ये (Lok Sabha) निवडणूक सुधारांवरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात तीव्र वाद झाला. अमित शाह यांच्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. त्यावर अमित शाह चांगलेच भडकले. तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही अशा शब्दात अमित शाह यांनी राहुल गांधींना सुनावले.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर टीका सुरू केली आहे. निवडणूक आयोगामुळे देशातील लोकशाही संपत चालली आहे, निवडणुकीमध्ये चुकीच्या गोष्टी होत आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यावर राहुल गांधींनी केलेले सर्व आरोप हे खोटे असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं. विपक्ष सतत मतदार यादीतील चुका दाखवतो, पण यादी जुनी असो वा नवी, तुमचा पराभव ठरलेलाच, असा टोला अमित शाह यांनी काँग्रेसला लगावला.
हरियाणाच्या निवडणुकीसंबंधी आपण जे मुद्दे मांडले, निवडणूक आयोगाने ज्या चुकीच्या गोष्टी केल्या त्यावर चर्चा करा असं आवाहन राहुल गांधी यांनी अमित शाहांना दिलं. त्यावर अमित शाह चांगलेच भडकले. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझ्या भाषणाचा क्रम काय असावा हे तुम्ही ठरवू शकत नाही. तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही असं अमित शाह म्हणाले.
पहिली व्होट चोरी नेहरुंनी केली, अमित शाहांचा आरोप
राहुल गांधी यांनी केलेल्या व्होट चोरीच्या आरोपांवर बोलताना अमित शाहांनी नेहरूंना लक्ष्य केलं. ते म्हणाले की, "मी तुम्हाला सांगतो की व्होट चोरी म्हणजे काय. तुम्ही पात्रतेशिवाय मतदार बनता. अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकता. जर तुम्ही जनादेशाचा अनादर केला तर ती व्होट चोरी आहे. नेहरू हे पहिले मत चोरी करणारे होते. पटेल यांना 28 मते मिळाली, तर नेहरूंना 2 मते मिळाली. तरीदेखील नेहरु पंतप्रधान झाले, ही पहिली व्होट चोरी होती. अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींचा विजय अवैध ठरवला होता. देशाचे नागरिकत्व मिळण्याआधी सोनिया गांधी मतदार कशा झाल्या?"
ही बातिमी वाचा: