नवी दिल्ली : पक्षाच्या आचारसंहितेविरोधात काम केल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप खासदार वरुण गांधी आणि सुब्रमण्यम स्वामी यांना दिला आहे. वरुण गांधी यांच्या भुवनेश्वरमधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील गैरहजेरीनंतर हा इशारा दिला असल्याची माहिती आहे.
वरुण गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून अप्रत्यक्षपणे सरकारच्या धोरणांवर टीकात्मक वक्तव्य केल्यामुळे हा इशारा देण्यात आला असावा, असं बोललं जात आहे. शेतकऱ्यांना छोट्या-छोट्या कर्जामुळे आत्महत्या करावी लागते, तर मोठे उद्योगपती हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात पळून जातात, असं वक्तव्य वरुण गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.
वरुण गांधी उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधून भाजपचे खासदार आहेत. भाजप पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त असताना वरुण गांधी यांनी इंदूरच्या एका खाजगी महाविद्यालायातील कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं.
भाजपचे एक वरीष्ठ मंत्री वरुण गांधी यांना केवळ पक्षविरोधी वक्तव्यांबाबत सूचना देणार आहेत. त्यानंतरही वरुण गांधी यांनी पक्षाच्या आचारसंहितेचा भंग केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या काळात रोहित वेमुला प्रकरणाचा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न केला होता, असंही बोललं जातं. वेमुलाची सुसाईड नोट पाहून डोळ्यात अश्रू आले, असं वक्तव्य त्यांनी दिल्लीतील एका शाळेत केलं होतं.
अमित शाह वरुण गांधी यांच्यासोबतच सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यांवरही नाराज असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामींनाही कारवाईचा इशारा दिला जाणार आहे.