चंदीगड : रिटेल मार्केटच्या यशानंतर आता योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली ब्रॅण्डने हॉटेल उद्योगातही एन्ट्री केली आहे. पतंजलीने चंदीगडच्या झीरकपूरमध्ये इंडियानो हॉटेलमध्ये 'पौष्टिक' नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं आहे.
इथल्या पदार्थांची चव घरच्या जेवणासारखी असेल, असा दावा करण्यात आला आहे. तसंच चव आणि ग्राहकांचं आरोग्य या दोन गोष्टींची खास काळजी इथे घेतली जात असल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली आहे.
सध्या या रेस्टॉरंटचं औपचारिक उद्घाटन झालेलं नाही. यासाठी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या तारखेची प्रतीक्षा आहे.
हॉटेलच्या भिंतींवर रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्णन यांचे फोटो आहेत.
रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी जेवण...
काही वृत्तानुसार, पौष्टिक रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी जेवणच मिळेल. शिवाय रेस्टॉरंटची थीम पूर्णत: घरगुती आहे. हॉटेलमधील बहुतांश वस्तू लाकडापासून बनलेल्या असून भांडी माती आणि तांब्याची आहेत. लायटिंगपासून डिझाईनमध्ये पतंजलि ब्रॅण्डचा रंग दिसतो.
मेन्यू कार्डवर रामदेव बाबा बालकृष्ण यांचे फोटो
मेन्यू कार्ड आणि रेस्टॉरंटचं डिझाईन पतंजलीच्या कुशल व्यवस्थापक आणि रामदेवबाबांच्या सल्ल्यानुसार तयार केलं आहे. इतकंच नाही तर मेन्यू कार्डवर रामदेव बाबा आणि बालकृष्ण यांचे फोटोही आहेत. याशिवाय मेन्यू कार्डवर लोकांच्या आरोग्याबाबत काही गोष्टी लिहिल्या आहेत.