पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारावर उपचार घेऊन येईपर्यंत गोव्यातील सरकार कसं चालवायचं, यासंदर्भात आज दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आढावा घेतला. भाजपच्या तीन खासदार आणि तीन निरीक्षकांकडून शाह यांनी गोव्यातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. ते येत्या दोन दिवसात आपला निर्णय कळवणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली.


तिसऱ्यांदा अमेरिकेत उपचार घेऊन आल्यानंतरही मुख्यमंत्री पर्रिकर यांची प्रकृती सुधारली नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार पर्रिकर यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. पर्रिकर यांना उपचार आणि विश्रांतीची गरज असल्याने दरम्यानच्या काळात राज्य सरकारचा कारभार कोलमडू नये यासाठी पर्यायी व्यवस्था किंवा नेतृत्व बदल करण्याची चर्चा जोर धरु लागली होती. पर्रिकर यांना दिल्लीला हलवण्याच्या आदल्या दिवसापासून भाजपने वेगाने चक्रे हलवून तीन निरीक्षकांना गोव्यात पाठवून परिस्थितीचा आढावा घेतला.

गेल्या आठवड्यात रामलाल, बी.एल. संतोष आणि विजय पुराणिक यांनी गोव्यात दोन दिवस तळ ठोकून भाजप आमदार, घटक पक्ष आणि गोवा भाजपच्या गाभा समिती सोबत चर्चा करून प्रत्येकाची मते जाणून घेतली. अमित शाहांनी आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर आणि तीन निरिक्षकांसोबत एकत्र बैठक घेतली.

सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत गोव्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. भाजप आणि घटक पक्षाच्या आमदारांनी व्यक्त केलेल्या मतांवर आणि पर्यायावर सविस्तर चर्चा झाली. गोव्यातील खासदारांनी खाणी लवकर कशा सुरु करता येतील यासह विकास कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाण्याची गरज व्यक्त केली.

अमित शाहांनी सगळ्यांची मते जाणून घेतली असून येत्या दोन दिवसात आपला निर्णय कळवू, असं सांगितल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी दिली.

दरम्यान, अमित शाहांनी गोव्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी तिन्ही खासदारांना आज दिल्लीत बोलावताच पर्रिकर यांच्या पर्यायाची चर्चा रंगू लागली. सकाळी केंद्रीय श्रीपाद नाईक तर दुपारपासून प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांचं नाव चर्चेत येऊ लागलं. नाईक आणि तेंडुलकर यांच्यात तेंडुलकर यांचं नाव आघाडीवर असल्याचं सूत्रांचं म्हणणे आहे. घटक पक्ष देखील तेंडुलकर यांच्यासाठी सहमत असल्याचं सांगितलं जात आहे. शाह नेमका कोणत्या पर्यायावर शिक्कामोर्तब करतात याकडे गोमंतकीयांचं लक्ष लागलं आहे.