नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीबाबत सुरु असणाऱ्या तर्क-वितर्कांना आज भाजपनं पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. मोदींची बीएची पदवी खोटी असल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता. त्याला उत्तर देताना दिल्लीत आज भाजपाध्यक्ष अमित आणि अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी सादर केली.



“पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतून बीएची, तर गुजरातमधून राज्यशास्त्र या विषयात एमएची पदवी घेतली. त्यामुळे शहानिशा न करता पंतप्रधानांवर खोटे आरोप करणाऱ्या केजरीवालांनी देशाची माफी मागावी”, अशीही मागणी भाजपनं केली.

 

 

यासंदर्भात, केजरीवालांवर भाजप अब्रूनुकसानीचा दावा करणार का, असा प्रश्न शाह यांना विचारला गेला. मात्र, असा कोणताही दावा भाजप करणार नसल्याचं शाह म्हणाले.

 

 

 

मोदींची पदवी खोटी असल्याच्या आरोपांवर 'आप' ठाम

 

अमित शाह आणि अरुण जेटली यांच्या पत्रकार परिषदेनंतर आम आदमी पक्षाने दावा केला आहे की, भाजपने सादर केलेली डिग्री खोटी आहे.

 

 

आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी सांगितले की, बीए डिग्रीमध्ये नरेंद्रकुमार दामोदरदास मोदी लिहिलं आहे, तर एमएमध्ये नरेंद्र दामोदरदास मोदी असं लिहिलं आहे. याचसोबत त्यांच्या मार्कशीटवर 1977 साल आहे, तर डिग्रीवर 1978 साल लिहिलं आहे.