नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बिहारनंतर पश्चिम बंगालमधील जनतेला संबोधित केलं. दिल्लीहून व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून झालेल्या भाषणात अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अमित शाह यांनी म्हटलं की, जरी देशाने भाजपला 303 जागा दिल्या तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी बंगालच्या लोकांनी भाजपच्या 18 जागा जिंकून दिल्या हे महत्त्वाचं आहे.
बंगाल सरकार केंद्राच्या योजना लागू करत नाही, असा आरोप करत अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांना आव्हान देताना म्हटले की, "ही राजकारण करण्याची गोष्ट नाही, राजकारणासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही मैदान ठरवा आणि समोरा-समोर येऊ. तुम्ही बंगालमधील गरिबांसाठी केंद्राची योजना लागू होऊ देत नाहीत.
बंगालमधील पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असणार
ममता बॅनर्जींवर जोरदार टीका करताना अमित शाह पुढे म्हणाले की, आम्ही प्रवासी मजुरांसाठी विशेष श्रमिक ट्रेनची सुविधा केली, मात्र ममता बॅनर्जींनी या ट्रेनला कोरोना एक्स्प्रेसचं नाव देऊन कामगारांचा अपमान केला आहे. शाह म्हणाले की मजुरांची ही गाडी तुम्हाला पळवून लावेल. तुम्ही काहीही करा पण पश्चिम बंगालमधील पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असणार आहे.
खासदार नुसरत जहांचं प्रत्युत्तर
खासदार नुसरत जहांने अमित शाहांच्या टिकेला उत्तर देताना म्हटलं की, फक्त बोलणारे आणि काही काम न करणारे चॅम्पियन परतले आहेत. आम्हाला अम्फान वादळ आणि कोरोनाशी लढण्यासाठी केंद्राची मदत हवी होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? असा सवाल अमित शाहांना विचारला. 2014 मध्ये अच्छे दिनचं आश्वासन देण्यात आलं होतं. यानंतर नोटाबंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, एनआरसी, सीएए, बेजबाबदरीने हाताळलेली करोना परिस्थिती, दुर्लक्षित मजूर या गोष्टी समोर आल्या. बंगालमधील लोक तुमच्या जाळ्यात अडकायला काही आंधळे नाहीत, असंही नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे.