नवी दिल्ली:  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रकृतीवरुन पसरत असलेल्या अफवांना त्यांनी ट्वीट करुन उत्तर दिलं आहे. शनिवारी ट्विटरवरुन आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं आहे. तसंच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन करताना अफवा पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. दरम्यान, अमित शाह यांच्या तब्येतीविषयी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या चौघांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. दोन व्यक्तींना भावनगर तर दोन व्यक्तींना अहमदाबादमधून अटक करण्यात आली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये अमित शाह (AMIT SHAH Twit)  यांनी म्हटलं आहे की, मागील काही आठवड्यांपासून माझ्या तब्येतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्वीट करुन प्रार्थनाही केली अशी सुरुवात करत अमित शाह यांनी कामात व्यस्त असल्याने आपण या अफवांकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. मात्र पक्ष कार्यकर्ते आणि शुभचिंतकांच्या काळजीपोटी आपण ठणठणीत असल्याचं मला सांगावं लागत असल्याचेही शाह यांनी म्हटलं आहे.

शाह यांनी म्हटलं आहे की, मागील काही दिवसांपासून काही मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या आरोग्यासंदर्भात वाटेल त्या अफवा पसरवल्या. काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्वीट करुन प्रार्थनाही केली.


देश सध्या कोरोनासारख्या जागतिक महारोगाशी लढा देत आहे. देशाचा गृहमंत्री म्हणून मी रात्रंदिवस माझ्या कामात व्यस्त असल्याने मी या गोष्टींकडे फारसे लक्ष दिलं नाही. जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली तेव्हा मी विचार केला की हे सर्व लोक त्यांच्या काल्पनिक आनंदामध्ये जगत आहेत. त्यामुळेच मी कोणतेही स्पष्टीकरण दिले आहे, असं अमित शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

मात्र माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांमुळे आणि माझ्या शुभचिंतकांमध्ये मागील दोन दिवसापासून यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात होती. त्यांच्या चिंतेकडे मी कानाडोळा करु शकत नाही. त्यामुळेच मी आज हे स्पष्ट करु इच्छितो की मी पूर्णपणे बरा आहे मला कोणताही आजार झालेला नाही, असं शाह यांनी सांगितलं आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, हिंदू धर्मातील मान्यतेनुसार असं मानलं जातं की अशाप्रकारची अफवा पसरवल्यास व्यक्ती अधिक मजबूत होते. त्यामुळे मी अशा सर्व लोकांकडून अपेक्षा करतो की त्यांनी या व्यर्थ गोष्टी करु नयेत आणि मला माझे काम करु द्यावे तसेच त्यांनी स्वत:चे काम करावे.

माझ्या तब्येतीबद्दल चिंता करणाऱ्या आणि विचारपूस करणाऱ्या माझ्या सर्व शुभचिंतकांचे आणि कार्यकर्त्याचे आभार मानतो. ज्या लोकांनी ही अफवा पसरवली आहे त्या लोकांविरोधात माझ्या मनात कोणताही राग नाही, असंही अमित शाह यांनी शेवटी म्हटलंय.