Amit Shah on Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला होता. या भ्याड हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यात आले होते. यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली होती. या पार्श्वभूमीवर कालपासून लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा केली जात आहे. भारतीय सैन्य चांगल्या स्थितीत असतानाही पाकिस्तानशी युद्ध अचानक का थांबवलं? अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेत विरोधकांना उत्तर दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, विरोधक काल विचारत होते, चांगल्या स्थितीत असूनही तुम्ही युद्ध का केले नाही? युद्धाचे अनेक परिमाण असतात, युद्ध करणे न करणे हे अत्यंत विचार करून करावे लागते. सांगोपांग विचार करून युद्धात निर्णय घ्यावे लागतात. पण, मी याच देशाच्या इतिहासाच्या काही घटना सांगू इच्छितो. 1948 साली कश्मीरमध्ये आपलं भारतीय सैन्य निर्णायक उंबरठ्यावर होते. सरदार पटेल तेव्हा नाही म्हणत राहिले आणि जवाहरलाल नेहरू यांनी एकतर्फी युद्धविराम केले.
पाकव्याप्त काश्मीरला जवाहरलाल नेहरूच जबाबदार
मी हे अत्यंत जबाबदारीने सांगत आहे. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. पाकव्याप्त काश्मीरचा अस्तित्व आहे तर ते जवाहरलाल नेहरू यांच्या युद्धविरामामुळेच आहे. पाकव्याप्त काश्मीरला जवाहरलाल नेहरूच जबाबदार आहेत, असा आरोप अमित शाह यांनी केला. तर 1960 साली सिंधू जल करारावर भौगोलिक आणि रणनीतिक मुद्द्यावर आपण अत्यंत मजबूत होतो. परंतु त्यावेळी 80 टक्के भारताचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले, असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
दरम्यान, अमित शाह यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती लोकसभेत दिली. अमित शाह म्हणाले की, पहलगाममध्ये पर्यटकांना मारणारे तिन्ही दहशतवादी मारण्यात आले. जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि सैन्याने ही कारवाई केली. दहशतवाद्यांकडून तीन रायफल जप्त करण्यात आल्या. सुलेमान, जिब्रान आणि अफझल हे दहशतवादी मारले गेले. पहलगाममध्ये ज्या रायफलने हल्ला करण्यात आला होता, त्याही दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. याच तीन दहशवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींनीही त्यांची ओळख पटवली आहे. आज (29 जुलै) पहाटे 4 वाजता दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन जणांना देखील अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा