अमेठी (उत्तरप्रदेश) : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अमेठीमध्ये गांधी घराण्याची 30 वर्षांपासून सत्ता आहे आणि ते गेल्या तीन वर्षांचा हिशोब आमच्याकडून मागत आहेत. मग त्यांनी 30 वर्षात त्यांनी काय केलं? असा सवाल अमित शाहांनी विचारला. राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यामध्ये आज अमित शहा होते. त्यावेळी त्यांनी गांधी घराण्यावर जोरदार टीका केली.

या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित होते. उत्तर प्रदेशमध्ये सरकार आल्यापासून अनेक विकास कामं सुरु केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

‘पाच वर्षात यूपी गुजरातसारखं असेल’

दरम्यान, यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, 'देशात विकासाचे दोन मॉडेल आहेत. एक गांधी-नेहरु परिवाराचं मॉडेल तर दुसरा मोदी मॉडेल. नेहरु-गांधी परिवारानं काय केलं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. पण मोदींच्या नेतृत्त्वात प्रत्येक गावात वीज पोहचवण्याचं काम सुरु आहे. प्रत्येक घरात गॅस सिलेंडर देण्याचं काम सुरु आहे. आज यूपीत योगीजी आणि देशात मोदीजी आहेत. ही जोडी नक्कीच विकास करेल. जेव्हा आम्ही मतं मागायला येऊ तेव्हा यूपी देखील गुजरात सारखंच असेल.'

‘आम्ही देशाला बोलणारा पंतप्रधान दिला’

'राहुल गांधी आम्हाला विचारतात तुम्ही आम्हाला काय दिलं? आम्ही देशाला बोलणारा पंतप्रधान दिला. देशाच्या सीमेवर सैनिक शहीद होत होते त्यांच्यावर कोणी काही बोलत नव्हतं. उरी हल्ल्यात 12 जवान शहीद झाले. संपूर्ण देशात संतापाचं वातावरण होतं. पण यावेळी देशात नरेंद्र मोदी सत्तेत होते. आमचे जवान पाकिस्तानमध्ये घुसले आणि जवानांच्या हत्येचा त्यांनी बदला घेतला.' असंही यावेळी अमित शाहा म्हणाले.