Amit Shah Plane Emergency Landing: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या विमानाचं बुधवारी गुवाहाटी (Guwahati) येथील गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग (Emergency landing) करावं लागलं. काल (बुधवारी) रात्री अमित शाह आगरतळाला पोहोचणार होते, पण खराब हवामानामुळे त्यांच्या विमानाची सकाळी 10.45 च्या सुमारास गुवाहाटी येथे एमरजन्सी लँडिंग करावं लागलं. 


अमित शाह बुधवारी ईशान्येकडील राज्यांकडे रवाना झाले होते. त्रिपुरामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा हा दौरा नियोजित करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आज (गुरुवारी) ईशान्येकडील राज्यात दोन रथयात्रा निघणार होत्या. त्रिपुरामध्ये या वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. 


अमित शाहांच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आलं. यासंदर्भात माहिती देताना पश्चिम त्रिपुराचे पोलीस अधीक्षक (एसपी) शंकर देबनाथ यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी रात्री 10 वाजता एमबीबी विमानतळावर उतरणार होते. परंतु दाट धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे विमानाचं लॅंडिंग करणं शक्य झालं नाही." 


11 वाजेपर्यंत आगरतळ्याला पोहोचायचं होतं


भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य यांनी सांगितलं की, उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर आणि दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील सबरूम उपविभागातून रथयात्रेला झेंडा दाखवण्यासाठी शाह बुधवारी आगरतळा येथे पोहोचणार होते. परंतु, इमर्जन्सी लॅंडिंगमुळे अमित शाहांना आपला मुक्काम गुवाहाटीतच करावा लागला. 


दोन्ही कार्यक्रमांना हिरवा कंदील दाखवणार : मुख्यमंत्री


त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा (Manik Saha) यांनी आदल्या दिवशी पत्रकारांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या त्रिपुरा दौऱ्याबाबत माहिती देताना सांगितलं होतं की, "जनविश्वास यात्रा पुढील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराला चिन्हांकित करेल. आम्हाला आनंद आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन्ही कार्यक्रमांना हिरवा झेंडा दाखवतील".


शाह सर्वप्रथम धर्मनगर येथे जातील आणि तिथे ते यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील आणि रॅलीला संबोधित करतील. साहा म्हणाले की, यानंतर ते सबरूम येथे जातील जिथे ते दुसर्‍या रथयात्रेचं उद्घाटन करतील आणि एका जाहीर सभेला संबोधित करतील. सबरूम कार्यक्रमानंतर शाह आगरतळाला परततील आणि संध्याकाळी त्रिपुराला रवाना होतील, असेंही त्यांनी सांगितलं.