नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशाच्या संविधान निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका होती, हे केवळ मिथक आहे, असं वक्तव्य राम बहादूर राय यांनी केलं आहे. राय यांची नुकतीच 'इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स'च्या चेअरमनपदी निवड झाली आहे.

 

राय हे माजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात एबीव्हीपीचे नेते आणि पत्रकार आहेत.

 

'आंबेडकरांनी केवळ भाषा आणि स्पेलिंग सुधारलं'

 

राय यांच्या मते, घटनानिर्मितीत आंबेडकरांचा मर्यादित वाटा होता.

"संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांची मोलाची अशी भूमिका नव्हती. संविधान निर्मितीसाठी त्यावेळी सरकारी कर्मचारी असलेले बी एन राव यांनी जे जे साहित्य पुरवलं, त्यामध्ये बाबासाहेबांनी करेक्शन करत, चुका आणि भाषा सुधारल्या. त्यामुळे त्यांनी घटना लिहिली असं म्हणणं चुकीचं आहे ", असं  राम बहादूर राय यांनी म्हटलं आहे.

 

राय यांच्या या दाव्यानंतर घटनानिर्मितीत बाबासाहेबांची भूमिका हे केवळ मिथक आहे असं तुमचं म्हणणं आहे का? असं विचारण्यात आलं. त्यावर राय म्हणाले, "होय ते एक मिथकच आहे. मिथ है, मिथ है, मिथ है."

 

इतंकच नाही तर तो एक राजकारणाचा भाग होता, असा दावाही त्यांनी केला.

 

राय यांची भूमिका भाजपला अमान्य

राय यांनी हा दावा केला असतानाच, भाजपने मात्र राय यांची भूमिका अमान्य केली आहे.

यापूर्वी संघप्रमुख मोहन भागवत यांनी जातीवर आधारित आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त केली होती. त्याचा फटका भाजपला बिहार निवडणुकीत बसला होता.

 

भाजपकडूनच राय यांच्यावर टीकास्त्र

राय यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपमधून टीकास्त्र सोडण्यात आलं. भाजपच्या अनुसुचित जाती शाखाप्रमुख दुश्यंत कुमार गौतम यांनी राय यांना धारेवर धरलं. तसंच राय यांचं हे वक्तव्य म्हणजे आंबेडकरांचा अपमान आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.