नवी दिल्ली: रिलायन्स जिओच्या जाहिरातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो प्रकाशित झाल्याने विरोधक आक्रमक झाले होते. अनेक राजकीय पक्षांनी पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवत, रिलायन्सवर कारवाईची मागणी केली होती. यावर आता कंपनीचे सीईओ मुकेश अंबानी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


 

''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझेही पंतप्रधान'' असल्याचे अंबानी यांनी म्हटलं आहे.

 



 

अंबानी म्हणाले की, ''आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाच्या कल्पनेतूनच प्रेरणा घेतली असून यामध्ये कोणतेही राजकारण नाही.'' जिओकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीचे समर्थन करताना, ते पुढे म्हणाले की, ''डिजिटल इंडियाला देशात बळकटी आणण्याचे आपले लक्ष्य आहे.''

 

जिओच्या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो प्रकाशित होताच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींची 'मिस्टर रिलायन्स' म्हणून खिल्ली उडवली होती. तसेच त्यांनी पंतप्रधानांवर रिलायन्स जिओच्या नव्या सेवेचा प्रचार केल्याचा आरोप केला होता.

 


 

केजरीवालांनी यासंदर्भात ट्वीट करून म्हटलं होते की, ''मोदीजी तुम्ही रिलायन्सच्या जाहिरातींसाठी मॉडेलिंग सुरुच ठेवा. साऱ्या देशातील मजूर 2019 मध्ये तुम्हाला धडा शिकवतील'' तर दुसरीकडे काँग्रेसनेही यावर टीकेची झोड उठवली होती. रिलायन्स कंपनीने आपली नवी सेवा सुरु करण्यासाठी मुखपृष्ठावर पंतप्रधानांची परवानगी न घेता फोटो छापले होते. त्यामुळे पंतप्रधानांनी रिलायन्सविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही केली होती.

 

काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, ''कोणत्याही जाहिरातींवर पंतप्रधानांचा फोटो प्रकाशित करण्यासाठी नियमावली आहे. अशा प्रकारच्या जाहिरातींवर पंतप्रधानांचे फोटो प्रकाशित करण्याआधी त्यांची परवानगी घेण्याची गरज असते. एक माजी केंद्रीय मंत्री राहिल्याने याची  मला माहिती आहे. तेव्हा रिलायन्सने यासाठी पंतप्रधानांकडून तशी परवानगी घेतली होती का? हे स्पष्ट करण्याची गरज आहे.''

 

माकन पुढे म्हणाले की, ''अशा प्रकारच्या जाहिरातींवर पंतप्रधानांचा फोटो छापण्याआधी त्यावर चर्चा केली जाते. कारण प्रधानमंत्री एक व्यक्तीच नव्हेत, तर ती एक संस्था आहे. जर त्यांची परवानगी न घेता अशा प्रकारे सर्रास फोटो छापले गेले. तर कॅडबरी किंवा चॉकलेटच्या उत्पादनांवरही त्यांचे फोटो प्रकाशित होतील.''