जम्मू-काश्मीर: अमरनाथ गुहेत आज बाबा बर्फानीचं पहिलं दर्शन होणार आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोहरा हे पहिली पूजा करणार आहेत. आजपासून बाबा बर्फांनींचं दर्शन घेता येणार असल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.


प्रशासनाकडून सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी सॅटेलाईट ट्रॅकिंग सिस्टमचाही वापर करण्यात आला आहे.


अमरनाथ हे पवित्र तीर्थस्थळ दक्षिण काश्मीरमधील पर्वतरांगांमध्ये आहे. या यात्रेसाठी 2.30 लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. दरम्यान पहलगाम आणि बालटाल या मार्गे 10 हजार भाविक दर्शन घेणार आहेत. पण पहलगाम आणि सोनमर्ग येथे मुसळधार पावसामुळे भाविकांची संख्या कमी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पुढील दिवस या भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या वर्षी ही यात्रा 40 दिवस चालणार आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेनं आठ दिवसाहून कमी आहे.

अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. यासाठी सरकारनं पोलीस, लष्कर, बीएसएफ आणि सीआरपीएफ असे एकूण 40 हजार जवान तैनात केले आहेत.