Alwar Demolition: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील राजगडमधील 300 वर्षांपूर्वीचे पुरतान शिव मंदिर पाडण्यात आले आहे.  यावरुन राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिव मंदिर पाडल्याच्या मुद्यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर निशाणा साधलाय. राजगडमधील  प्राचीन मंदिर पाडणे हा भाजपशासित महापालिका मंडळाचा निषेधार्ह निर्णय आहे. आम्ही सर्व धर्मांच्या धर्म स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे या घटनेबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) माफी मागावी अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे.


दरम्यान, दुसरीकडे राजस्थानमध्ये तीन मंदिरे पाडण्याचे प्रकरणावरुन भाजपने राज्यातील सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला. अलवरच्या येथील सुमारे 300 वर्षे जुने मंदिर पाडल्याने संतप्त झालेले भाजप नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ही धर्मनिरपेक्षता आहे का? असा सवाल मालवीय यांनी केला आहे. विकासाच्या नावाखाली अलवर जिल्ह्यातील पुरातन असणारे 300 वर्षे जुने मंदिर पाडल्याचे मालवीय म्हणाले. हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहोचवण्याचे काम काँग्रेसने केल्याचे मालवीय यांनी म्हटले आहेत.





 
काय आहे संपूर्ण प्रकरण?


राजस्थानमधील अलवरमधील राजगडमध्ये तीन मंदिरे पाडल्याची घटना समोर आली आहे. या मंदिरांमध्ये शिव, हनुमान तसेच इतर अनेक देवतांच्या मूर्ती होत्या. त्या तोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, मंदिराच्या गाभाऱ्याचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. तेथून विधीवत पुजा करुन मूर्ती हटवण्यात आल्या आहेत. त्यांची विधिवत प्रतिष्ठापना देखील करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


दरम्यान, मंदिर पाडल्याचा निषेध करत हिंदू संघटनांनी राजगडचे काँग्रेस आमदार जोहरीलाल मीना, उपविभागीय अधिकारी केशव कुमार मीना आणि नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी बीएल मीना यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तिघांवरही मंदिर उद्ध्वस्त करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. विकासाच्या नावाखाली मंदिर उद्ध्वस्त करणे योग्य नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. त्याचवेळी हा रस्ता रुंद करण्यासाठी अतिक्रमण हटवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले. तर दुसरीकडे ब्रिजभूमी कल्याण परिषदेचे अध्यक्ष पंकज गुप्ता म्हणाले की, गेहलोत सरकार हिंदुविरोधी आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.