नवी दिल्ली : उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्ती अशा अनेक उपमा ज्यांना कमी पडतील अशा माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं दु:खद निधन झालं. रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनानंतर भाजप नेत्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.


सुषमा स्वराज्य यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. त्या असामान्य राजकीय नेत्या होत्या. त्यांची भाषणशैली खूप ओघवती होती. त्या उत्कृष्ट संसदपटू होत्या.  आमची मैत्री पक्षीय राजकारणापलीकडे होती, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील तेजस्वी अध्यायाचा अस्त झाला आहे. त्यांनी जनहितासाठी आणि गरिबांसाठी आयुष्यभर काम केलं. त्या उत्तम वक्ता, उत्तम प्रशासक होत्या. प्रकृती ठिक नसतानाही त्यांनी गेल्या पाच वर्षात माझ्या मंत्रिमंडळात त्यांनी अविश्रांत काम केलं. लोकांना न्याय देण्यासाठी त्या सदैव तत्पर असत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


सुषमा स्वराज यांच्या निधनाने प्रचंड दु:ख झालं. देशाने आपली लाडकी लेक गमावली आहे. धाडस आणि निष्ठेचं त्या मूर्तीमंत उदाहरण होत्या. लोकांच्या मदतीसाठी त्या नेहमीच तत्पर असायच्या. त्यांची सेवा आणि योगदान देश कदापी विसरणार नाही, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आदरांजली अर्पण केली आहे.


सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.


सुषमा स्वराज यांनी आपल्या आयुष्यात विक्रम करण्याचाच विक्रम केला आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. देशातील सर्वात तरुण महिला राजकारणी, आमदार, दोन वेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्री, खासदार, विरोधी पक्ष नेत्या आणि परराष्ट्र मंत्री!हे सारं त्यांनी एकाच आयुष्यात साध्य केलं. त्यांच्या निधनामुळे आपलं खूप मोठं नुकसान झालं असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. सुषमा स्वराज यांच्या निधनाने हिंदुस्थानी राजकारणातून एका तेजस्वी युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुषमाजींच्या जाण्याने केवळ देश आणि भारतीय जनता पक्षाचीच नव्हे, तर ठाकरे परिवाराचीही अपरिमित हानी झाली आहे. त्यांनी अनेकदा शिवसेना आणि भाजपमधील प्रेमाचा दुवा म्हणून काम केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुषमाजी यांच्या नात्यात एक आत्मीयता होती. बाळासाहेबांच्या जाण्यानंतरही हे नातं कायम राहिलं. त्यांच्या वागण्या-बोलण्यात आणि नेतृत्वात तेज होतं तसंच मांगल्यही होतं. मी संपूर्ण शिवसेना आणि ठाकरे परिवारातर्फे त्यांना श्रद्धासुमनं अर्पण करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

सुषमा स्वराज यांच्या निधनाने भाजप आणि भारतीय राजकारणाची अपरिमीत हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.


सुषमा स्वराज यांचे अचानक निधन झाल्याचे एकून अत्यंत दुःख झाले. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी आपली एक वेगळी छाप सोडली. त्या उत्कृष्ट संसदपटू होत्या, हिंदी भाषेवर तर त्यांचे निर्विवाद प्रभुत्व होते. विरोधी पक्ष नेता असताना सत्ता पक्षातील नेत्यांशी त्याचे सौहार्दाचे संबंध होते, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर भावनिक पोस्ट केली. सुषमा स्वराज यांच्याकडून मला मोठ्या बहिणीचे प्रेम मिळाले अशा शब्दांत त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


सुषमा स्वराज यांचे निधन हा खूप मोठा धक्का आहे. एक उत्कृष्ट संसदपटू, प्रभावी वक्ता, दयाशील आणि लोकप्रिय नेत्या म्हणून त्या कायम लक्षात राहतील. आपल्या जीवनात संघर्ष आणि अथक परिश्रम करत यशाची शिखरं त्यांनी गाठली होती, असे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.


सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे न भरून निघणारं नुकसान झालं आहे. संकटात सापडलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी त्या धावून जायच्या! अगदी एक नर्स असेल तरी. त्यांचे योगदान भारतीय नेहमी लक्षात ठेवतील, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.