नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री 9 वाजण्याचा सुमारास स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या, बेशुद्धावस्थेत त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


भारतीय जनता पक्षाला मीडिया फ्रेंडली बनवण्यात सुषमा स्वराज यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यानंतर सोशल मीडिया भारतात अॅक्टिव्ह झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह करणे, पक्षाचा आणि त्यांच्याकडे असणाऱ्या परराष्ट्र खात्याचा कारभारही त्यांनी सोशल मीडियाद्वारे लोकांसमोर मांडला. त्या स्वतः सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह होत्या.

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अडल्या-नडलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वराज यांनी नेहमीच मदत केली आहे. कोणत्याही व्यक्तीने एक ट्वीट करुन आपली अडचण मांडावी आणि स्वराज यांनी त्यांची अडचण सोडवली, याची शेकडो उदाहरणे आहेत. त्या स्वतः ट्विटरवर खूप अॅक्टिव्ह होत्या. आज सायंकाळी 7 वाजता स्वराज यांनी ट्वीट करुन जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. हे त्यांचं शेवटचं ट्वीट ठरलं आहे.

सुप्रीम कोर्टातील वकील ते पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्रमंत्री; सुषमा स्वराज यांची धडाकेबाज कारकीर्द

मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर झाले. त्यानंतर आपल्या ट्वीटमध्ये सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. हा दिवस माझ्या आयुष्यात पाहण्याची मी कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. असं ट्वीट स्वराज यांनी 7.30 वाजण्याच्या सुमारास केले होते.




व्हिडीओ पाहा