आग्रा : होळीच्या दिवशी रंगांपासून वाचण्यासाठी उत्तर प्रदेशातील मशिद कापडांनी झाकण्यात आली होती. शांततेच्या वातावरणात सण पार पडावा यासाठी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना काळजी घेण्याचे आदेश दिले होते.


जाणूनबुजून किंवा चुकून, होळीच्या रंगांमुळे धार्मिक स्थळांच्या भिंती रंगू नयेत, रचनेला धोका पोहचू नये, याची काळजी घ्या, मग त्या कापडांनी झाकाव्या लागल्या तरी चालतील, असे आदेश आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी 27 फेब्रुवारीला व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती.

अलिगढमधील सब्जी मंडी मशिद विविध कापडांनी झाकण्यात आली होती. शुक्रवारी मशिदीत नमाज पठण केलं जातं, होळी शुक्रवारी येत असल्यामुळे काळजी घेणं आवश्यक होतं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. रंगांनी भरलेले फुगे धार्मिक स्थळांवर मारल्यामुळे दोन समुदायांमध्ये वाद झाल्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे.

धार्मिक गटांतले वाद टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मशिद कापडाने झाकण्यात आली. नमाजाच्या वेळेतही अर्ध्या तासाने बदल करण्यात आले होते.