नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यांच्यातील चिन्हासाठीच्या वादात अखिलेश यांनी बाजी मारली आहे. समाजवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह 'सायकल' या दोन्ही गोष्टी अखिलेश यादव यांना मिळालं आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगनं आज आपला महत्वपूर्ण निर्णय जाहीर करुन अखिलेश यादव यांना दिलासा दिला आहे.


मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांच्या नेतृत्त्वात आयोगाने शुक्रवारी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगानं आज आपला आदेश जाहीर केला. समाजवादी पार्टीच्या तब्बल 200 आमदारांचा पाठिंबा अखिलेश यादव यांना होता.

नियमांनुसार निवडणूक आयोगाला जेव्हा कधी अशाप्रकारचा निर्णय घ्यावयाचा असतो, त्यावेळी संपूर्ण आयोगाची बैठक बोलवावी लागते, त्यानंतरच निर्णय घेतला जातो. ही बैठक साधारणत: मंगळवारी आणि शुक्रवारी होते. मात्र, आतापर्यंत अशी कुठेही माहिती मिळाली नाही की, बैठक आज (सोमवारी) आयोजित केलेली आहे. मात्र, निवडणूक आयोगानं आज संपूर्ण आयोगाची बैठक बोलावून निर्णय जाहीर केला.

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची सुरुवात 17 जानेवारीपासून होणार आहे. उत्तर प्रदेशात एकूण 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.

समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी 1 जानेवारीला बोलावलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात आले. त्यानंतर आधीपासूनच समाजवादी पक्षात सुरु असलेल्या वादाला मोठं वळण मिळालं.

याच अधिवेशनात मुलायसिंह यादव यांना पक्षाच्या मार्गदर्शकपदी नियुक्त करण्यात आले. त्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी या सर्व निर्णयांचा विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला. आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून ‘सायकल’ हे निवडणूक चिन्हही आपल्याजवळच राहायला हवं, असा दावा त्यांनी केला होता.

आता उत्तर प्रदेशातील निवडणुकीत ‘सायकल’सवारी करत अखिलेश यादव प्रचार कोण करणार, हे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर निश्चित झालं आहे.