मुंबई: देशभरातील विमानतळावरील पार्किंग पुढील एक आठवड्याभरासाठी मोफत करण्यात आली आहे. मुंबईसह देशातील आंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांचं पार्किंग सुट्ट्या पैशांच्या अभावामुळे मोफत करण्याचा निर्णय एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने घेतला आहे.


येत्या सोमवारपर्यंत हे पार्किंग मोफत असणार आहे. विमानतळांवर पार्किंगचे दर १५० रुपयांपासून सुरू होतात आणि तासानुसार पैसे आकारले जातात.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यातील टोल नाक्यांवरील वसुलीही 18 नोव्हेंबरपर्यंत बंद असणार आहे. दुसरीकडे पेट्रोलपंप, रेल्वे, विमान तिकीट, मेट्रो, रुग्णालयं, वीज भरणा केंद्र आणि शासकीय कर भरण्यासाठी जुन्या नोटा 24 तारखेपर्यंत वैध असणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी दिली.

सध्या बँक आणि एटीएम मशीनमध्ये पुरेसे पैसे पोहोचलेले नाहीत. त्यामुळं रोजच्या व्यवहारांसाठी लोकांना अडचणी येत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन सरकारनं 24 तारखेपर्यंत जुन्या नोटांना मुदतवाढ दिली आहे.