मुंबई : महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी (Air Marshal VR Chaudhari) हे भारतीय वायू दलाचे नवीन प्रमुख होणार आहेत. भारतीय वायू दलाचे विद्यमान प्रमुख आर.के.एस भदौरीया (Air Chief Marshal RKS Bhadauria) हे 30 सप्टेंबर रोजी सेवा निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी मराठवाड्यातील नांदेडचे भूमीपुत्र विवेक चौधरी एअर चीफ मार्शल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. 


Next Chief of Air Staff : एअर मार्शल वी आर चौधरी हवाई दलाचे नवे प्रमुख


देशाचे नवे एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका येथील छोटेशा हस्तरा गावचे मूळ राहवाशी आहेत. विवेक चौधरी यांचे आजोबा हदगाव तालुक्यातील कोळी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक होते. विवेक चौधरी यांचे काका दिनकर चौधरी हे नांदेड येथे वास्तव्यास आहेत तर रत्नाकर चौधरी हे व्यवसायानिमित्त औरंगाबाद येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील आज पन्नास ते साठ वर्षापूर्वी तेलंगणातील हैदराबाद येथे गेले व त्याच ठिकाणी स्थायिक झाले. त्यांचे वडील हैद्राबाद येथील भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड या कंपनीत नोकरीस होते तर आई शिक्षिका होत्या.


विवेक चौधरी यांना दुसरे एक बंधू असून ते कॅनडा येथे स्थायिक आहेत. चौधरी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे हैद्राबाद येथे झाले तर उर्वरित शिक्षण हे पुणे व दिल्ली या ठिकाणी झाले आहे. ते पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकादमी चे 1980 दशकातील विद्यार्थी असून ते 29 डिसेंबर 1982 साली वायू सेनेत रुजू झाले होते. विवेक चौधरी यांना मिग आणि सुखोई ही लढाऊ विमाने उडविण्याचा 3800 तासांचा अनुभव आहे. वायू दलाचे उपप्रमुख होण्याअगोदर ते वायू दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ होते. नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र असणाऱ्या एअर मार्शल विवेक यांची निवड झाल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले आहे.